बेंगळूर / प्रतिनिधी
380 जिवंत भारतीय स्टार कासवांसह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, या कासवांचा विलुप्त होणाऱ्य़ा प्रजाती मध्ये समावेश असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. पोलिस उपायुक्त (डीसीपी) संजीव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 401 भारतीय स्टार कासव जप्त करण्यात आले आहेत, जे एका व्यक्तीने दोन बॉक्समध्ये ठेवले होते. यापैकी 21 मृत आणि 20 जण गंभीर अवस्थेत सापडली आहेत. बन्नेरघट्टा नॅशनल पार्कमधील एक टीम बेंगळूर येथे दाखल झाली असून गंभीर स्थितीत असलेल्या कासवांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
एका माहितीच्या आधारे कलासिपल्या पोलिसांनी छापा टाकून मुथू हमद मीरा याला ताब्यात घेतले असून हा व्यक्ती सोमवारी कासव विकण्याचा प्रयत्न करत होता. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत कलम 9, 39, 40, 44, 48A, 51 आणि 55 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारा कासव, त्याच्या कवचावरील गुंतागुंतीच्या पॅटर्नमुळे त्याचे वेगळेपण सिध्द होते. आणि काही देशांमध्ये पाळण्यासाठी याची तस्करी केले जाते.









