सकाळी अनेक वारकऱयांच्या वारी विठ्ठलापूरात.

प्रतिनिधी /डिचोली
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱया विठ्ठलापूर साखळी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी मोठय़ा भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळीपासूनच वारकऱयांच्या वारी विठ्ठलापूरात दाखल झाल्या आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने हा संपूर्ण परिसर दणाणून सोडला. संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात मोठय़ा संख्येने भाविक भक्तां?नी श्रींचे दर्शन घेतले. सकाळी शिरोली सत्तरी येथील श्री संत फटी महाराज मठ येथील श्री वारकरी सांप्रदाय मंडळाची वारी, कारापूर येथील श्री शांतादुर्गा वारकरी मंडळाची वारी, सालेली सत्तरी येथील श्री सिध्देश्वर माऊली ज्ञानोबा वारकरी मंडळाची वारी तसेच नाव्हेली येथील भाविकांची वारी मंदिरात दाखल झाल्या. विठ्ठल नामाचा जयघोष आणि नायस्मरणाने हा संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात साखळी सम्राट क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या फुलांची रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंदिराच्या आत स्पर्धकांनी सदर आकर्षक रांगोळी रेखाटल्याने एक वेगळेच चित्र दिसून आले.
संध्याकाळी मंदिरात होंडा सत्तरी येथील स्वर सत्तरी भजनी मंडळाकडून भजन सादर करण्यात आले. त्यात गायक विठ्ठल गावस, लता गावस, नियती गावस यांनी सहभाग घेतला. तर त्यांना हार्मोनियमवर महेश गावस, तबल्यावर शैलेश शिरोडकर यांनी साथसंगत केली. हा कार्यक्रम बहारदार झाला. या देवस्थाने अध्यक्ष प्रतापसिंह राणे, उपाध्यक्ष उदयसिंह राणे, सचिव सुर्याजीराव राणे, मुखत्यार भाऊसाहेब राणे, खजिनदार मिलींद राणे हे यावेळी मंदिरात उपस्थित होते.









