प्रतिनिधी / कोल्हापूर
बॉक्समधील गुळाच्या वजनावरुन बाजार समितीत सोमवारी पुन्हा वाद उफाळला. एक महिन्यापूर्वी समितीने दिलेला निर्णय अमान्य करत व्यापार्यांनी गुळाचे सौदे बंद पाडल्याने तणाव निर्माण झाला. मात्र प्रशासक मंडळ, व्यापारी आणि शेतकरी यांच्या संयुक्त बैठकीत 18 किलो बॉक्सचे वजन आणि बॉक्स शेतकर्यांना परत देण्यावर एकमत झाल्याने मंगळवार दि. १६ पासून सौदे पूर्ववत सुरु होणार आहेत.
बाजार समितीत बॉक्सच्या वजनावरुन शेतकरी-व्यापारी यांच्यात दररोज खटके उडत आहेत. यावर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी करीत गूळ उत्पादक शेतकर्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर धडक मारली होती. याची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी व्यापार्यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर प्रशासक मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी बैठक घेऊन तोडगा काढला होता. 18 किलो 600 ग्रॅम वजन आले, तरी पाचशे ग्रॅम कमी करुन हिशोब देण्याचा निर्णय झाला होता. सर्वांनी यास सहमती दर्शवली होती. मात्र तब्बल एक महिन्यानंतर व्यापार्यांनी तोडगा अमान्य करत सौदे बंद पाडले. अचानकपणे व्यापार्यांनी भूमिका बदलल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त करीत बाजार समिती मुख्यालयावर मोर्चा काढला. काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी के. पी. पाटील, सदस्य सूर्यकांत पाटील, विश्वास पाटील, सचिव जयवंत पाटील यांनी शेतकर्यांबरोबर चर्चा केली. दुपारी दोनच्या सुमारास गूळ व्यापारी, शेतकरी यांची संयुक्त बैठक घेतली. व्यापार्यांच्या वतीने निलेश पटेल, कनक वेद, विक्रम खाडे तर शेतकर्यांच्या वतीने अमित पाटील, समिंदर पाटील, पांडूरंग पाटील उपस्थित होते.