म्यानमारमध्ये लपून भारतावर कब्जाचे स्वप्न
इम्फाळ
चीन आणि म्यानमारच्या सीमेने वेढला गेलेला ईशान्य भारत पुन्हा एकदा भीषण उग्रवादी हल्ल्याला बळी पडले आहे. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात अनेक सैनिक हुतात्मा झाले. हल्ल्यात कमांडिग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांना हौतात्म्य प्राप्त झाले. तर त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) मणिपूरने स्वीकारली आहे. या उग्रवादी संघटनेचे चीनचे सैन्य पीएलएसोबत कनेक्शन आहे.
या भीषण हल्ल्याच्या प्रारंभिक तपासात हा कट पूर्वनियोजित होता असे आढळून आले आहे. या हल्ल्यात आधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त 15 हून अधिक उग्रवादी सामील होते. त्यांनी 3 आयईडी स्फोट घडवून आणल्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. पीएलए मणिपूरचे दहशतवादी चीनच्या चिथावणीनुसार मणिपूरमध्ये हल्ले घडवून आणत असल्याचे गुप्तचरांचे सांगणे आहे. मणिपूरच्या पीएलएला चिनी सैन्याने प्रशिक्षण दिले आहे. हे उग्रवादी हल्ले करून म्यानमारमध्ये पसार होतात.
चीनच्या मदतीने भारताविरोधात कट
ईशान्य भागाला भारतापासून वेगळे करण्याचे स्वप्न पाहणारा उग्रवादी नेता एन. विश्वेश्वरने या संघटनेची निर्मिती केली होती. ही उग्रवादी संघटना चीनच्या मदतीने भारताला तोडण्याचे स्वप्न पाहत आहे. ही उग्रवादी संघटना माओवादी आणि मार्क्सवादी विचारसरणीला मानणारी आहे. पीएलएच्या उग्रवाद्यांनी आतापर्यंत अनेक भीषण हल्ले घडवून आणले आहेत. 2009 मध्ये पीएलएचा एक उग्रवादी पकडला गेला होता, सार्जंट रोनी असे त्याचे नाव होते. त्याने चौकशीदरम्यान चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी मणिपूरच्या पीएलएसोबत संपर्कात असल्याचे सांगितले होते.
उग्रवाद्यांना म्यानमारमध्ये प्रशिक्षण
चीनमध्ये प्रशिक्षण घेतल्यावर उग्रवादी भारतात परतले होते. त्यांना मोठी आणि घातक शस्त्रास्त्रs हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मणिपूरच्या पीएलए उग्रवाद्यांना म्यानमारमध्ये सातत्याने प्रशिक्षण दिले जातेय. मणिपूरमध्ये देखील या उग्रवादी गटाचे अनेक तात्पुरते तळ असून यात सिंघात सामील आहे. तेथेच शनिवारी हा हल्ला घडला आहे. चीनकडून शस्त्रास्त्रांचा अवैध पुरवठा म्यानमारच्या उग्रवाद्यांना होत असल्याने भारतासाठी धोका निर्माण झाल्याचे युरोपियन फौंडेशन फॉर साउथ एशियन स्टडीच्या एका अहवालात म्हटले गेले आहे.
म्यानमारमधील संकटाची धग म्यानमारमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार सुरू असल्याने अनेक उग्रवादी गट निर्माण झाले आहेत. हे उग्रवादी सैन्यासोबत युद्ध लढत आहेत. त्यांना मोठय़ा प्रमाणावर नवी शस्त्रास्त्रs आणि अन्य सामग्री चीनकडून मिळत आहे. ही शस्त्रास्त्रs आता ईशान्य भारतातील राज्यांमध्येही पोहोचत आहेत. साउथ एशिया टेररिजम पोर्टलनुसार मणिपूरच्या पीएलएला नागा उग्रवादी गट एनएससीएनकडूनही म्यानमारमध्ये प्रशिक्षण मिळाले आहे. एनएससीएनचे चिनी सैन्यासोबत अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत.









