कुपवाड / प्रतिनिधी
सांगलीतील एका बेदाणा व्यापाऱ्याने कुपवाडमधील बेदाणा व्यापाऱ्याला तब्बल ४ लाख ५९ हजार २६८ रुपयांला चुना लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी संशयित दिपेन अश्विन वसा रा.जवाहरनगर, सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद महालिंग अथणीकर रा. कुपवाड यांनी फिर्याद दिली आहे. संशयित दिपेन वसा यांनी तासगावमधील तीन कोल्ड स्टोअरेज मधून ४ लाख ५९ हजार २६८ रुपयांच्या ७४ बेदाणा बॉक्सची खरेदी करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अथणीकरच्या नावावर व्यापारी दिपेन वसा यांनी ६ जुलै २०२१ ते ६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत तासगावमधील गायत्री कोल्ड स्टोअरेज मधून ८० बॉक्स, एस.एस.ॲग्रोटेक मधून ४८ बॉक्स असे १२८ बॉक्स ३ लाख ८९ हजार ६ रुपये किंमतीचा माल खरेदी केला. त्यानंतर व्यंकटेश कोल्ड स्टोअरेज मधून २६ बॉक्स बेदाणा किंमत ७० हजार २६२ रुपये असे एकूण ७४ बेदाणा बॉक्सची खरेदी करून ४ लाख ५९ हजार २६८ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.








