वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते गायत्री प्रजापती आणि अन्य दोघांना एका बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच त्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.
येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी. के. राय यांनी गेल्या बुधवारी या तिन्ही आरोपींना दोषी धरले होते. त्यांना शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली. त्यांच्यावरील आरोप निःसंशयरित्या सिद्ध झाल्याने त्यांना शिक्षा देण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णय पत्रात स्पष्ट केले आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना प्रजापती हे त्यांच्या मंत्रिमंडळात परिवहन आणि खाण उद्योगमंत्री होते. बलात्कार प्रकरणात त्यांना मार्च 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून त्यांच्याविरोधात येथील गौतमपल्ली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2017 पासून प्रजापती हा कारागृहातच आहे.









