प्रशासनाची हुकूमशाही, पोलिसांची दडपशाही, हलगा-मच्छे बायपास कामाला सुरूवात : शेतकऱयाच्या मुलाने घेतले पेटवून, एका शेतकऱयाचा वाढला रक्तदाब
प्रतिनिधी / बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी उभ्या पिकात प्रशासनाने जेसीबी घुसविला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱयांनी आक्रमक पवित्रा घेतला तर शेतकऱयाच्या मुलाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःलाच पेटवून घेतले. परंतु मुर्दाड प्रशासनाला पाझर फुटला नाही आणि उभ्या पिकात जेसीबी फिरत असल्याचे पहात राहण्यापलिकडे शेतकऱयाच्या हातात काहीच राहिले नाही. बुधवारी सकाळी झालेल्या या प्रकारामुळे शेतकऱयांनी प्रशासनाच्या नावाने शिमगा केला.
हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकात जेसीबी घालण्याचा घाट रचून पिके आडवी केली. ही आडवी होणारी पिके पाहून शेतकरी अक्षरशः तळमळला तर या प्रकारामुळे शेतकऱयाच्या मुलाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले. तरी देखील थोडीही माणुसकी नसलेल्या प्रशासनाने उसाच्या उभ्या पिकात जेसीबी चालवून हुकूमशाही दाखवून दिली. या हुकूमशाहीमुळे सारेच तळमळले, गहिवरले आणि हतबल झाले.
असे असले तरी शेतकऱयाचे दुःख कोणालाच दिसले नाही. अक्षरशः शेतकरी तळमळला तरी देखील मुर्दाड प्रशासनाला त्याचे काहीच वाटले नाही आणि हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी उभ्या पिकावर जेसीबी फिरविला गेला.
पोलिसांचा फौजफाटा, कंत्राटदाराची यंत्रसामुग्री आणि प्रशासनाच्या अट्टहासासमोर शेतकऱयाचा टिकाव लागला नाही. राजकीय वरदहस्त आणि सरकारकडून मिळालेल्या आदेशाच्या जोरावर बेळगाव परिसरातील शेतकऱयांच्या हृदयावरच घाव घालण्याचा संतापजनक प्रकार मच्छे येथे गुरुवारी घडला. या प्रकारामुळे समस्त शेतकरी वर्गाबरोबरच सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आम्ही पिकवितो तेव्हा तुम्ही जेवण करतात. तो मंत्री असो की अधिकारी असो किंवा सामान्य व्यक्ती असो. मात्र जो अन्न पिकवितो त्याच्याच अन्नावर जेसीबी फिरविता? तेव्हा तुम्हाला देव माफ करणार नाही, अशी आर्त हाक यावेळी महिला मारत होत्या.
रस्ता करायचा असेल तर चर्चा करा, जमिनीच्या बदल्यात जमीन द्या किंवा जमिनीला योग्य दाम द्या, अशी वारंवार मागणी शेतकऱयांनी केली. मात्र त्याची कोणतीच दखल न घेता थेट गुरुवारी मच्छेपासून हलग्यापर्यंत होणाऱया रस्त्याच्या कामाला सुरूवात केली. यापूर्वी शेतकऱयांनी तीव्र आंदोलन केले. विरोध दर्शविला. कंत्राटदाराला पिटाळून लावले. शेतकऱयांची ताकद एकत्र आली आणि हा रस्ता बरेच दिवस तटविला. मात्र जिल्हा प्रशासन आणि राजकीय संगनमतापुढे शेतकऱयाला काहीच करता आले नाही.
बुधवारी या रस्त्याचे काम करण्यासाठी कंत्राटदार यंत्रसामुग्री घेऊन मच्छे येथे हजर झाला होता. मात्र शेतकऱयांनी तीव्र विरोध करुन त्यांना पिटाळले होते. त्यानंतर प्रशासन आणि कंत्राटदारांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन गुरुवारी ते दाखल झाले. त्यांनी कामाला सुरूवात केली. यावेळी शेतकऱयांमध्ये आणि त्यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. प्रकाश नाईक, राजू मरवे यांच्यासह हणमंत बाळेकुंद्री, विनायक चतुर यासह इतर शेतकऱयांना जबरदस्तीने धक्काबुक्की करत वाहनांत घातले. त्यानंतर त्यांना बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नेले. हणमंत बाळेकुंद्री या शेतकऱयाच्या छातीला मार बसला आहे. त्यामुळे तो अत्यवस्थ झाला. त्यानंतर त्याला पोलिसांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

साऱयांचेच डोळे पाणावले
मच्छे येथील अनगोळकर कुटुंबीयांनी यावषी आपल्या शेतामध्ये ऊस लागवड केली होती. हा ऊस तब्बल 15 फुटापेक्षाही अधिक वाढला होता. अनिल अनगोळकर आणि त्यांची मुले आकाश व अमित यांनी वर्षभर शेतामध्ये मोठे कष्ट केले होते. ऊस पिकाच्या उत्पादनासाठी संपूर्ण कुटुंब वर्षभर राबले. आता तोडणी करुन हा ऊस कारखान्याला पाठवून द्यायच्या तयारीत असताना उभ्या पिकावर जेसीबी चालविला गेला. त्यामुळे अक्षरशः या शेतकऱयाने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. अधिकाऱयांकडे गयावया केली. मात्र मुर्दाड असलेल्या या अधिकाऱयांना त्यांची कोणतीच दया आली नाही.
आकाश 50 टक्के भाजून जखमी
पोलिसांची दमदाटी आणि अधिकाऱयांची मनमानी पाहून शेवटी आकाश याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलीस प्रशासन आणि प्रांताधिकारी यांचीही चांगलीच तारांबळ उडाली. काय कराचे हे सुचले नाही. शेवटी आग विझवून त्याला रुग्णवाहिकेतून तातडीने सिव्हिल हॉस्पिटलकडे हलविण्यात आले. या घटनेत आकाश हा 50 टक्के भाजला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
तुमचीच अवकृपा म्हणून मला हे करावे लागले
शेतकऱयाच्या मुलाने पेटवून घेतल्यामुळे त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना मिळाली. त्यानंतर एम. जी. हिरेमठ हे तातडीने सिव्हिल हॉस्पिटलकडे जाऊन पेटवून घेतलेल्या आकाश याची विचारपूस केली. यावेळी आकाश याने जिल्हाधिकाऱयांना चांगलेच सुनावले. ‘तुमचीच अवकृपा त्यामुळे मला पेटवून घ्यावे लागले’ असे सांगून चांगलेच खडसावले. त्यामुळे जिल्हाधिकारी निरुत्तर झाले. त्यानंतर डॉक्टरांना योग्य प्रकारे उपचार करा, असे सांगून तेथून ते निघून गेले.
धक्काबुक्की आणि शेतकऱयाचा वाढला रक्तदाब
आपले पीक आता जाणार, आपली जमीन जाणार या तणावाखाली विनायक चतुर हा शेतकरी गेल्या काही दिवसांपासून होता. गुरुवारी पुन्हा रस्ता करण्यासाठी येणार अशी माहिती मिळताच तेही मच्छे येथे विरोध करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी विरोध करता पोलिसांनी त्यांना वाहनात कोंबून धक्काबुक्की केली. वाढलेला रक्तदाब आणि धक्काबुक्की यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातून तातडीने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांना अधिक उपचारासाठी केएलईमध्ये हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
आम्ही आदेशाचे पालन करत आहे
प्रांताधिकारी रवींद्र करलिंगण्णावर यांना पत्रकारांनी घेरून विचारले असता आम्ही आदेशाचे पालन करत आहे, असे सांगितले. यावेळी शेतकऱयांनीही त्यांना चांगलेच धारेवर धरले. तुमची शेती आहे का? तुमची शेती गेली असती तर काय केला असता? असा प्रश्न केला. यावेळी हतबल झालेल्या प्रांताधिकाऱयांनी आम्ही केवळ आदेशाचे पालन करत आहे, असे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी शेतकऱयांनी त्यांच्यावर शिव्याशापाचा भडीमार केला.
पोलीस उपायुक्तांचीही घेतली चांगलीच हजेरी
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे हे घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी काही शेतकऱयांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. बेकायदेशीर कामे करणाऱयांना तुम्ही पाठिशी घालता काय? असा प्रश्न विचारला. काही तरी चांगले काम करा, तुम्हाला देव आशिर्वाद देईल, असे सांगितले. यावेळी तेही निरुत्तर झाले होते. पत्रकारांनीही त्यांना चांगलेच छेडले. यावेळी आमच्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संरक्षण मागितले आहे ते आमचे कर्तव्य आहे म्हणून आम्ही त्यांना संरक्षण देत आहे, असे सांगितले. यावेळी शेतकऱयांनी त्यांनाही चांगलेच धारेवर धरले होते.
कंत्राटदाराने सांगितले अलारवाडजवळ झिरोपॉईंट
या रस्त्याचे काम घेतलेले कंत्राटदार यांनाही या रस्त्याबाबत विचारले. झिरो पॉईंट कोठे येतो? असे विचारले असता कंत्राटदाराने नवीन आराखडय़ाप्रमाणे झिरो पॉईंट हा अलारवाड क्रॉसजवळ येतो असे सांगितले. मग फिश मार्केटजवळचा झिरो पॉईंट कोणता? असे विचारले असता तो पूर्वीचा झिरो पॉईंट आहे. मात्र आताचा झिरो पॉईंट हा अलारवाडजवळ येतो असे सांगितले. नोटिफीकेशनबद्दलही त्यांना विचारले. मात्र केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली.
रस्त्यात एकाही राजकीय व्यक्तीची जमीन नाही
या रस्त्यामध्ये एखाद्या राजकीय व्यक्तीची जमीन आली असती तर हा रस्ता रद्द अथवा दुसऱया मार्गाने केला असता. या रस्त्यात एकाही राजकीय व्यक्तीची जमीन नाही. मात्र या रस्त्याला लागून अनेक राजकीय व्यक्तींनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्या जमिनीचा दर वाढविण्यासाठीच हा रस्ता करत आहेत, असा आरोप यावेळी शेतकऱयांनी केला आहे.
बेकायदेशीर कामकाज
हलगा-मच्छे बायपास रस्त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या ठिकाणी न्यायालयाने शेतकऱयांच्या बाजूने दिलासादायक स्थगिती दिली आहे. असे असताना अचानकपणे दडपशाही करत शेतकऱयांच्या उभ्या पिकांवर जेसीबी फिरवून बेकायदेशीर काम सुरू केले. हे अत्यंत चुकीचे आहे. आता या विरोधात पुन्हा न्यायालयीन लढाई लढावी लागणार आणि ती समर्थपणे लढु, असे बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी सांगितले.
या रस्त्याच्या कामाला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रकाश नाईक, राजू मरवे, हणमंत बाळेकुंद्री, विनायक चतुर, अनिल अनगोळकर यांच्यासह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राजश्री गुरण्णावर, चुन्नाप्पा पुजेरी यांच्यासह इतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र पोलीस फौजफाटय़ासमोर शेतकऱयांचे काहीच चालले नाही.
एसीपी एन. व्ही. बरमनी, बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर, पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.









