मध्य रेल्वे प्रशासनाची कारवाई, ३५ अतिक्रमणांवर हातोडा
प्रतिनिधी / मिरज
सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामाई समोरील रेल्वेच्या जागेवरील सुमारे 30 ते 35 घरांचे अतिक्रमण गुरुवारी हटविण्यात आले. रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि महात्मा गांधी चौक पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान रेल्वेने कारवाई केल्यामुळे बेघर झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टीकडून करण्यात आली आहे. मात्र सदर नागरीकांचे पुनर्वसन करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने नकार दिला आहे.
सांगली रस्त्यावरील कृपामाईच्या समोर मध्य रेल्वे प्रशासनाची मोकळी जागा आहे. या जागेवर गेल्या काही वर्षांपासून अनेक नागरिकांनी घरे बांधून वास्तव्य केले होते. मात्र सदर घरे अतिक्रमण असल्यामुळे ती काढून घेण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने केल्या होत्या. अतिक्रमणधारकांना नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. मात्र या नोटिसाना न जुमानता अतिक्रमण कायम ठेवल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने पोलिसांच्या बंदोबस्तात सदर अतिक्रमणांवर हातोडा उगारला. गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत सुमारे तीस-पस्तीस घरे काढण्यात आली.








