प्राबल्य असलेल्या जागांसंबंधी वाटाघाटी : गिरीश चोडणकर, जुझे फिलीप डिसोझा यांच्याकडून दुजोरा
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युतीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून दोन्ही पक्षांदरम्यान आपापले प्राबल्य असलेल्या जागा वाटून घेण्यासंबंधी वाटाघाटी झाल्या. मात्र ही चर्चा प्राथमिक स्वरुपाचीच असल्यामुळे अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
त्यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चर्चेच्या वृत्तास दुजोरा दिला.
गेल्या महिन्यात दिल्लीत शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात झालेल्या बैठकीत युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक पातळीवर चर्चा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यातूनच ही बैठक घेण्यात आली व त्यातून सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी आपापले प्राबल्य असलेल्या मतदारसंघांबद्दल विचारांचे आदानप्रदान केले. त्यानुसार राष्ट्रवादीने आठ मतदारसंघांची मागणी केली आहे. मात्र फलश्रूती झाल्यास राष्ट्रवादीच्या पदरात जास्तीत जास्त पाच जागा पडू शकतात, असा अंदाज आहे. पक्षाचे विद्यमान एकमेव आमदार चर्चिल आलेमाव हे आपल्या बाणावली मतदारसंघावर दावा करणार आहेत. त्याशिवाय यंदा त्यांची कन्या वालांकाही नावेलीतून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. परंतु दोघांनाही एकाच पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे. असे असले तरी वालांका यांनी आपण कोणत्याही पक्षातर्फे निवडणूक लढवणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
अन्य समविचारी पक्षांशीही बोलणी : चोडणकर
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांशी आज झालेली चर्चा ही केवळ प्राथमिक बैठक होती. अन्य अनेक समविचारी पक्षांशीही आमची बोलणी चालू आहेत. त्यामुळे याक्षणी तरी काँग्रेस पक्ष कोणत्याही निर्णयाप्रत आलेला नाही, अशी माहिती श्री. चोडणकर यांनी दिली.









