27 डिसेंबर रोजी होणार पुढील सुनावणी
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांचा आखाडा भरविला जातो. या आखाडय़ाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांनी भेट दिली होती. त्यावेळी विधानसभा निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे त्यांनी योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे आचारसंहिता भंग झाली म्हणून भिडे गुरुजींसह शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्यासह आखाडा कमिटीच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी जेएमएफसी द्वितीय न्यायालयात सुरू आहे. मंगळवारी सुनावणी होती. मात्र ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.
येळ्ळूरच्या कुस्ती आखाडय़ाला भेट दिल्यानंतर संभाजीराव भिडे गुरुजी यांनी उपस्थित असलेल्या सर्व कुस्ती शौकिनांना योग्य व्यक्तीला मतदान करा आणि विजयी करा, असे आवाहन केले. त्यानंतर निवडणूक अधिकाऱयांनी त्यांच्या विरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला. कुस्ती आखाडय़ाचे प्रदीप देसाई, मधू पाटील, डी. जी. पाटील, नागेंद्र पाखरे, विलास नंदी, दुद्दाप्पा बागेवाडी, लक्की मोदगेकर आणि मारुती कुगजी (मयत) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या दीड वर्षापासून खटल्याची सुनावणी सुरू आहे. मंगळवारी सुनावणी होणार होती. पण ती सुनावणी 27 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर काम पाहत आहेत.









