किमान वेतन कायदा कुठे गेला
प्रतिनिधी /सांगे
विश्वास बसणार नाही असा हा धक्कादायक प्रकार आहे. मुळात किमान वेतन कायदा अस्तित्वात असताना महिना शंबर रुपये रक्कमेवर सरकारी काम करणारी व्यक्ती मिळणे कठीणच. मात्र, ही वस्तुस्थिती आहे. नेत्रावळी-सांगे येथिल ग्रामीण आरोग्य केंद्रात 31 वर्षे झाडू आणि पाणी भरणाऱया वृद्ध लक्ष्मी वसंत मोरजकर महिलेची. महिना 100 रुपये तुटपुंज्या रक्कमेवर ती गुजराण करीत आहे.
आज लक्ष्मी सारख्या अनेक महिला विविध सरकारी कार्यालयात तुटपुंज्या मानधनावर झाडू मारणे व साफ सफाईचे काम करीत आहे. त्यांची आर्त हाक सरकारला ऐकू जात नाही. आज बऱयाच सरकारी कार्यालयात पूर्णवेळ सफाई कामगार नाही. त्यामुळे अर्धवेळ कुणाकडून तरी काम करून घेतले जाते. मात्र, किमान वेतनाला साजेसे मानधन देण्याचे सौजन्य सरकारी खाते दाखवित नाही. आज अनेक सरकारी कार्यालयात हा प्रकार दिसून येतो.
असाच प्रकार नेत्रावळी ग्रामीण ग्रामीण आरोग्य केंद्रात घडला आहे. नेत्रावळीतील लक्ष्मी मोरजकर ही अनुसूचित जातीमधील महिला 1990 पासून चक्क महिना 100 रुपयात सरकारला सेवा देत आहे. हे ऐकून आचर्याचा धक्का तर बसणार उलट माणुसकी शिल्लक आहे काय ? असा प्रश्न पडल्यावाचुन राहणार नाही.
आज पगारवाढीसाठी संप केला जातो. पण, पगार वाढ करा म्हणून सांगितले तर नोकरी गमावून बसणार या भीतीने या महिलेने कधी आवाज काढला नाही. वयाच्या साठीकडे झुकलेल्या या माहिलेकडून झाडू मारण्याचे तसेच साफ सफाईचे काम होणार नसल्याने कामावर येऊ नका म्हणून सांगण्यात आल्याची माहिती मिळाली.
घरात मोठी तीन मुले. तीही बेकार, त्यातच 31 वर्षे केवळ महिना 100 रुपयात काम करून शेवटी पदरी निराश्या पडलेल्या या माहिलेपुढे संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न उभा ठाकला आहे. सरकार आपल्याला मदत करेल, या एकाच आशेवर ती जीवन कंठत आहे.
माझ्या सुनेला तरी नेत्रावळी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात आपल्या जागेवर योग्य तो पगार देऊन घावें, असे सांगताना या मातेला अश्रू आवरता आले नाही.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्या भाषणात आपले सरकार हे अंत्योदय तत्वावर काम करणारे असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काम करणारे आहे असे सांगतात. त्यामुळे मुख्यमंत्री काही तरी करतील असा लक्ष्मी मोरजकरना विश्वास वाटतो.
मानधनात वाढ करण्यात यावी म्हणून 2017 साली लक्ष्मी हिने तत्कालीन सरकारकडे पत्र व्यवहार केला. पण वाढ काही झाली नाही. कुणालाच तिची दया आली नाही. जानेवारी 2021 मध्ये तीने सप्टेंबर ते डिसेम्बर 2020 पर्यंतचा चार महिन्याचे 400 रुपये रक्कम घेतली आहे. त्यानंतर ती कामावर गेली. पण, अजून पैसे दिलेले नाही अशी माहिती तिच्या घरच्यानी दिली.
वय झाल्याने ती आज आजारी आहे. चालता येईना. पूर्वी ती दोन किलोमीटर चालून कामाला यायची. नेत्रावळी ग्रामीण आरोग्य केंद्राचा एक वेगळा नावलौकीक आहे. दिवसाला सरासरी 50 रुग्ण येतात. आज एक आयुर्वेदिक व एक ऍलोपॅथी डॉक्टरची सेवा उपलब्ध आहे.
वास्तविक आरोग्य खात्याने 16.11.1990 रोजी एका आदेशाद्वारे लक्ष्मी यांना दि. 13.11.1990 पासून झाडू मारणे व पाणी भरण्यासाठी नेत्रावळी आरोग्य केंद्रात रुजू करून घेतले. पण कालांतराने वेळोवेळी मानधनात वाढ करण्याचा विसर पडला. महागाई वाढते याचेही भान राहिले नाही. महिन्याला मिळणारा 100 रुपये आणण्यासाठी कधी कधी सांगे प्राथमिक केंद्रात जावे लागत असे. त्यातील पैसे बस प्रवासाला जायचे. अशातच तिन्ही मुलांना कसेबसे लहानाचे मोठे केले. आत्ता कामही नाही, पुढे काय ? हा प्रश्न तिच्यासमोर आवासून उभा आहे. सरकारी नोकराला पेन्शन मिळते, तेही नाही. सरकारने माणुसकीच्या दृष्टीकोनातून लक्ष्मीला मदतीचा हात धावा अशीच मागणी होत आहे.









