पुणे 300 तर मुंबई 700 रुपये लागतात मोजावे;
प्रतिनिधी/. गोडोली
एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे गाडय़ा बंद असल्याने खासगी वाहतूक करणारांनी चांगलेच उखळ पांढरे करायला सुरुवात केली आहे. पुणे, मुंबईला जाणाऱया नोकरदार, चाकरमान्यांना याचा चांगलाच फटका बसत असून पुण्याला 300 तर मुंबईला 700 रुपये मोजावे लागत आहे. याबाबत थेट आरटीओ कार्यालयात तक्रारी आल्याने भरारी पथकाने जादा पैसे घेणाऱया वाहनांचे परवाने निलंबन आणि दंडात्मक कारवाईच्या कचाटय़ात काही खासगी वाहनधारक सापडले. एसटी तिकीट दरापेक्षा दिडपट पैसे आकारणी करु शकतात, मात्र त्यापेक्षा जास्त पैसे घेतलेली तक्रार ज्या वाहनाबाबत येईल, त्याचा परवाना रद्द करुन अधिक नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.
एसटी कर्मचाऱयांच्या विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या माहोलमध्ये संप करुन शासनाला खिंडीत पकडले आहे. याचा फटका सुट्टीवरुन पुन्हा पुण्या मुंबईकडे परत जाणाऱया चाकरमान्यासह त्यांच्या कुटुंबाला बसू लागला आहे. लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान भरुन काढण्याच्या इराद्याने खासगी वाहतूक करणाऱयांने जादा पैसे घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्याला 130 दर असताना 300 तर मुंबईला 400 च्या दरम्यान असताना 700 रुपये मोजावे लागत आहेत. बसस्थानकाला लागूनच प्रवाशी घेतले जात असताना कारवाई होत नसल्याने काही प्रवाशानी थेट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्याकडे याबाबत तक्रार केली. तत्काळ भरारी पथक पाठवून संबंधित वाहनावर कारवाई करायला सुरुवात झाल्याने खासगी वाहतूकदारांची चांगलीच पळापळी झाली.








