वृत्त संस्था/ बेलग्रेड (सर्बिया)
येथे नुकत्याच झालेल्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्लांनी पाच पदकांची कमाई केली. 2017 साली पहिल्यांदा ही स्पर्धा भरविली गेली. दरम्यान या स्पर्धेच्या इतिहासामध्ये भारतीय मल्लांची यावेळची कामगिरी अधिक यशस्वी झाल्याचे दिसून येते.
2021 च्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारताच्या शिवाणी पवारने 50 किलो गटात रौप्यपदक तर अंजु, दिव्या काकरन, राधिका आणि निशा दाहिया यांनी अनुक्रमे 55, 62, 65, 72 किलो वजनगटात प्रत्येकी एक कास्यपदक मिळविले. या स्पर्धेत यजमान सर्बियाने सर्वाधिक पदकांची कमाई केली. पुरूषांच्या ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल या प्रकारात भारतीय मल्लांची कामगिरी निराशाजनक झाली. पुरूष मल्लांना एकही पदक मिळविता आले नाही.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पुरूषांच्या 74 आणि 125 किलो वजन गटातील फ्रीस्टाईल रिपचेज फेरीतील सामन्यात भारताच्या प्रवीण मलिक आणि मोहित ग्रेवाल याला प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागला. पुरूषांच्या फ्री स्टाईल सांघिक विभागात रशियाने 145 गुणांसह जेतेपद तर इराणने 140 गुणांसह दुसरे स्थान आणि अर्मेनियाने 114 गुणांसह तिसरे स्थान मिळविले.









