प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दाखल झालेले अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वसमावेशक पॅनेलच्या प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक जिल्हा बँकेत तब्बल चार तास पार पडली. या बैठकीत विविध मुद्यांवर खल झाला. गृहनिर्माणमधून खासदार उदयनराजेंच्या विरोधात उमेदवारी द्यायची अन् उमेदवारास निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा असा निर्धार या बैठकीत केल्याचे समजते. दरम्यान, ज्यांना अर्ज मागे घ्यायचा आहे त्यांना सूचना दिल्या गेल्या आहेत. त्याकरता तीन दिवस बाकी उरले असून अद्यापही कोणाचा अर्ज ठेवायचा हे ठरले असून ते अद्याप नेत्यांनी जाहीर केले नाही. दुसऱया बाजूला भाजपा प्रणीत आघाडीनेही आराखडे तयार केले आहेत. त्यांनीही कुठेही गवगवा केला नाही. त्यामुळे उद्यापासून आणखी घडामोडींना खरे स्वरुप चित्र पहायला मिळणार आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वसमावेशक पॅनेलची बैठक रविवारी जिल्हा बँकेत पार पडली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, राजूशेठ राजपुरे, महाबळेश्वरचे सभापती संजय गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जिल्हा बँकेच्या चौथ्या मजल्यावर गेस्ट रुममध्ये घडामोडी झाल्या. राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वसमावेश पॅनेल कसे असेल त्यामध्ये कोणकोण आहे, पवारसाहेबांनी कोणाकोणाला संधी द्यायची असे सांगितले आहे तर कोणाला अर्ज मागे घ्यायला लावले आहे यावर चर्चा झाली. दरम्यान, खासदार उदयनराजे हे ज्या मतदार संघात उभे राहणार आहेत त्याच मतदार संघातून उमेदवार देवून भरघोस मतांनी राष्ट्रवादी पॅनेलचाच उमेदवार कसा निवडून येईल यासाठी व्युहरचना या बैठकीत ठरली. तसा निर्धारही करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, ज्यांना अर्ज मागे घ्या अशा सूचना वैयक्तिकरित्या त्यांच्या नेत्यांनी दिल्या आहेत. तर ज्यांचा अर्ज ठेवायचा आहे. त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. फक्त पॅनेलचा आराखडा कसा करायचा. विरोधकांची कशी गळचेपी करायची यावर चर्चा झाली.
भाजपा प्रणीत पॅनेलचा कुठेही गवगवा नाही
भाजपा प्रणीत पेनेलचे प्रमुख खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी नेमकी काय व्युहरचना केली आहे. बैठका कुठे सुरु आहेत. उमेदवार पॅनेलमध्ये कोण कोण असणार आहे यावर कसलीही चर्चा वा कुठेही गवगवा झाला नाही. मात्र, त्यांनी सत्ताधाऱयांना चांगलेच जेरीस आणायचे नियोजन केल्याचे समजते.
सोमवारी कोण कोण अर्ज घेणार मागे
दिवाळी झाल्यानंतर आता सोमवारी जिल्हा बँकेमध्ये कोण कोण अर्ज मागे घेणार हे उद्या दुपारी चित्र स्पष्ट होणार असून उद्याही राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वसमावेशक पॅनेलची बैठक होणार आहेत. त्या बैठकीत पुन्हा चर्चेचे गुऱहाळ रंगणार आहे.








