वाळवा / वार्ताहर
वाळवा येथे ऐन दिवाळीत तासगांव रस्ता महादेवनगर परिसरामध्ये बाळासो महादेव कदम यांच्या घरी, त्याचप्रमाणे मिरजकर निवास येथे राहणाऱ्या शब्बीर मेहबुब काकडकी, मच्छिंद्र प्रभु खुराडे या कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी हात मारला. यामध्ये चोरट्यांनी दोन लाख रुपयांचे सोने लंपास केले, परंतु तिसऱ्या दिवशी शब्बिर काकडकी यांच्या कपड्याच्या बॅगेत ठेवलेले सोने चोरांनी सोने हाती न लागल्यामुळे कपड्यांच्या बॅगा जवळच असलेल्या शेतात फेकुन दिल्या, त्या बॅगा सापडल्या आहेत. बॅगेतले रोख रक्कम ६ हजार रुपये मात्र चोरट्यांनी लंपास केले. दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री २ ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे. या घटनेमुळे वाळवा गावात खळबळ उडाली आहे.
याबाबत आष्टा पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गजानन कदम यांच्या मातोश्री श्रीमती पुतळाबाई बाळासाहेब कदम या घरात झोपल्या होत्या, त्यांच्या हातातील दोन पाटल्या धाडसाने कशाने तरी कट करून चोरटयांनी त्या लंपास केल्या. कदम यांच्या घरातून लांबवलेल्या २ पाटल्या १ लाख रुपये किमतीच्या आहेत. कदम याच्या घरापासुन थोडे अंतर असलेल्या शब्बीर मेहबुब काकडकी यांच्या घरात कपड्यांनी भरलेल्या पिशवीमध्ये ठेवलेले सोन्याचे लॉकेट, चेन असा दोन तोळ्यांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला, थोडया अंतरावर असलेल्या मच्छिंद्र प्रभू खराडे यांच्या घरीही चोरट्यांनी हात मारला, परंतु त्यांना काही सापडले नाही. तेथे काही रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
याबाबत गजानन महादेव कदम (वय ४९) यांनी आष्टा पोलीसांत फिर्याद दिली आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक मनोज सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली डी. व्ही. सदामते अधिक तपास करीत आहेत. या परिसरामध्ये वारंवार चोरी होत असून, या भागामध्ये असलेल्या ऊसाच्या शेतांमधुन चोर गावात प्रवेश करत असावेत. असा गावकऱ्यांचा अंदाज आहे. वाळवा गावात अलीकडे चोरीच्या घटना वाढल्या आहेत, त्या थांबाव्यात यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग करावे. अशी मागणी लोकांच्या मधून होत आहे.









