प्रतिनिधी / कराड :
कराड येथील बुधवार पेठ परिसरात बेकायदा पिस्टल घेऊन फिरणाऱ्यास शहर पोलिसांनी शनिवारी रात्री गजाआड केले. अल्तमश उर्फ मोन्या असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 98 हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना 1 युवक पिस्टल घेऊन कराड नगरपरिषद परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाटील यांनी पेट्रोलिंग करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, विकास शेडगे, रघुवीर देसाई आणि बी. आर. यादव यांना कळवले. या पथकाने तातडीने नगरपरिषद परिसरात जाऊन संशयिताचा शोध घेतला. सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अंग झडती घेतली असता पँटच्या हुकला लावलेले पिस्टल आढळून आले. त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी रविवारी सकाळी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.