प्रतिनिधी/ रत्नािगरी
जयगड येथील एका कंपनीमधून जाणाऱया कोळशाच्या बोटीमुळे जयगड येथील बोट दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला आह़े 10 दिवस उलटूनही बोटीवरील खलाशी न सापडल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत़
मागील दहा दिवसांपूर्वी जयगड बंदरातून बेपत्ता झालेली बोट अद्याप आढळून आलेली नाह़ी या बोटीवरील एका खलाशाचा मृतदेह सापडला मात्र उर्वरित 6 जणांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाह़ी यामुळे स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जयगड येथील बडय़ा कंपनीवर आरोप करण्यास सुरूवात केली आह़े नुकतीच यासंदर्भात गुहागर पालशेत, साखरी आगर, जयगड, वरवडे, व आजूबाजूच्या परिसरातील मच्छीमारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये बोट कशी गायब झाली याबाबत प्रशासनाने माहिती देण्याची मागणी करण्यात आल़ी
26 ऑक्टोबर रोजी 5 खलाशी व 2 तांडेल यांच्यासह जयगड येथील मच्छी व्यवसायिकाची समुद्रात गेलेल्या बोटीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. या बोटीवरचे एक खलाशी अनिल गोविंद आंबेकर यांचा मृतदेह काही दिवसापूर्वी सापडला होता. त्यानंतर या तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही.
जयगड येथील कंपनीची कोळसा घेऊन एक मोठी बोट 26 ऑक्टोबर रोजी समुद्रात गेली होत़ी कंपनीच्या प्लांट हेडच्या म्हणण्यानुसार रात्री मच्छीमारी बोटीबाबत काही तरी घटना घडल्याची माहिती प्राप्त झाली व या कंपनीने त्याबाबत शासकीय यंत्रणेला कळवले होते.
या नौकेवर खलाशी व तांडेल दगडू गोविंद नाटेकर, गोकुळ तुकाराम नाटेकर, अनिल गोविंद आंबेकर, सुरेश धाकू कांबळे (सर्व, रा. गुहागर) तालुक्यातील साखरीआगर गावाचे रहिवासी असून दत्तात्रय सुरेश झगडे (रा. अडूर) व अमोल गोविंद जाधव (रा. मासू) असे सहा खलाशी व तांडेल गुहागर तालुक्यातील आहेत़ या नौकेच्या शोधासाठी याच मालकाच्या दुसऱया बोटीच्या वायरलेसवरून खलाशांशी संपर्क साधला असता आम्ही आता दाभोळच्या उपर असल्याचे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर या बोटीशी कोणताही संपर्क झालेला नसल्याचे बोटमालक मुनताह मुहम्मद शरीफ टेमकर यांनी जबाबात म्हटले आहे. या घटनेला 10 दिवस होऊन गेले तरी ही बोट व त्यावरील खलाशांशी संपर्क झालेला नाही व शोधही लागलेला नाही.
जयगड बोट दुर्घटनेची चौकशी करावी
डॉ. विनय नातू यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जयगड बंदरातून मच्छीमारीसाठी बाहेर पडलेल्या नावेद 2 या मच्छीमार बोटीला जयगड बंदरात येणाऱया एका मोठय़ा बोटीने धडक दिल्यामुळे ती बोट बुडाली आहे. त्यावरील सर्व खलाशांचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण गंभीर असून बंदर व कोस्टगार्ड विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नावेद 2 ही नौका आखून दिलेल्या रेषेमध्येच मच्छीमारी करत होती, परंतु मोठय़ा बोटीने आपला मार्ग सोडून या बोटीला धडक दिल्याने या बोटीतील सर्व खलाशांचा मृत्यू झाला. हा अपघात प्रत्यक्ष काही बोटींनी पाहिला. एवढेच नव्हे तर मच्छीमार बोटीवरील मृतदेहसुद्धा पाहिले, परंतु ते किनाऱयावर आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. अप्रत्यक्षरीत्या अशा बोटीसुद्धा या गुह्यामध्ये सहभागी आहेत असा दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे.









