आणखी 10 बकऱयांसह दोघे जण जखमी : 5 लाखाचे नुकसान
वार्ताहर /कडोली
वाळू घेऊन जाणाऱया एका भरधाव डंपरच्या धडकेत रस्त्याच्या बाजूने जाणाऱया कळपातील 30 बकरी ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी अगसगा रस्त्यावर घडली. या घटनेत एक महिला, एक इसमासह 10 बकरी जखमी झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कडोली येथील धनगर समाजाचे मल्लाप्पा बिराप्पा शहापूरकर यांचा बकऱयाचा कळप दिवसभर हिंडून अगसगा रस्त्याने मूळ ठिकाणी जाताना कडोली आंबेवाडी नजीक राजगोळीहून वाळू घेऊन येणाऱया डंपरने (केए 25 सी 2356) 30 हून अधिक बकऱयांना चिरडले असून 10 हून अधिक बकरी जखमी झाली आहेत. शिवाय कळपासोबत असणारे बिराप्पा शहापूरकर आणि फकिरव्वा मल्लाप्पा शहापूर हेही या डंपरच्या धडकेत जखमी झाले आहेत. या दोघांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ आणि सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शिवाय कडोली प्राथमिक पशू आरोग्य केंद्राचे पशूवैद्याधिकारी गंगारेड्डी यांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
सुमारे 5 लाखाचे नुकसान
या घटनेत भरधाव आलेल्या डंपरच्या धडकेत अनेक बकऱयांचा चेंदामेंदा झाला असून बकऱयाचे शव रस्त्यावर इकडे तिकडे विखुरलेले दिसत होते. ही घटना पाहून अनेकांचे मन सुन्न झाले होते. मल्लाप्पा शहापूरकर या गरीब धनगराचे मोठे नुकसान झाले आहे. घडलेल्या घटनेत धनगराचे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रा. पं. उपाध्यक्षा प्रेमा नरोटी, ग्रा. पं. सदस्य राजू मायाण्णा, सिद्दाप्पा शहापूरकर उपस्थित होते. शिवाय कडोली गावातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.









