आगारात चौकशी कक्षासह सुविधांचा अभाव : ग्रामीण भागात बसेस नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल
वार्ताहर /खानापूर
येथील बसस्थानक म्हणजे असुविधांचे माहेरघर बनले आहे. बसस्थानक व आगाराचा हायटेक विस्तार करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. हायटेक बस स्थानकासाठी मंजूर झालेला निधी राजकीय हस्तक्षेपात गेल्या दोन वर्षात रखडला होता. आता आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर हायटेक बसस्थानकाचा प्रस्ताव आहे. पण निधी मंजूर होऊनही निविदा प्रक्रिया निघत नसल्याने हायटेक बसस्थानक कधी होणार, असा प्रश्न प्रवासीवर्ग व शालेय विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या हायटेक बसस्थानकासाठी जवळपास साडेसहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून निविदा प्रक्रियेचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. परंतु या हायटेक बस स्थानकाचा प्रश्न कधी एकदा मार्गी लागणार, असा प्रश्न विद्यार्थी व प्रवासीवर्गात उपस्थित झाला आहे.
खानापूर बसस्थानक परिसरात खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसस्थानक प्रवेशद्वारावर दुतर्फा खड्डे काही नवीन नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासीवर्गाला खानापूर आल्याचा नक्कीच भास होतो, अशी स्थिती आहे. बसस्थानक परिसरातील डांबर पूर्णतः उखडून गेला आहे. यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. बस स्थानकाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी सुविधांचा अभाव आहे.
या ठिकाणी प्रवासी बस व वेळापत्रकाची चौकशी करण्यासाठी कक्षही नाही. त्यामुळे चौकशी कुठे करावी, असा प्रश्न प्रवासी वर्गामध्ये निर्माण झाला आहे. बस किती वाजता येणार व किती वाजता सुटणार याचे कोणतेही वेळापत्रक बसस्थानकात नाही. प्रत्येकाला आगाराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मुख्य कक्षात जाऊन चौकशी करावी लागते. चौकशीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बऱयाच वेळा दरडावण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशद्वारावरच बसची वाट बघत थांबलेले असतात. त्यामुळे बस सोडण्याचे वेळापत्रक व नियोजन ढासळल्याने विद्यार्थीवर्गांचे हाल होत आहेत.
सकाळच्या वेळी या बस आगारातून सुटणाऱया बसेस वेळेत सुटत नाहीत. त्यामुळे दिवसभराचे वेळापत्रक कोलमडते. अनेक बसचालक व वाहक वेळेवर डय़ुटीवर हजर होत नसल्याने पुढील प्रवास रखडतो. त्यामुळे बऱयाच वेळा शालेय विद्यार्थ्यांना वेळेत शाळेवर पोहोचता येत नाही.
या बस आगारातून केवळ 62 बसेस कार्यरत असून त्याही मोडकळीला आल्या आहेत. तालुक्मयात पंचाहत्तरहून अधिक बसेसची गरज आहे. केवळ 62 बसेस असल्याने आगार व्यवस्थापनाला सर्वच विभागात बस सोडताना कसरत करावी लागत आहे. अद्याप किमान 15 ते 20 बसेस आवश्यक आहेत. दर्जेदार व नवीन बसेस खानापूरच्या बस आगारात नाहीत. त्यामुळे नियोजन करताना आगारप्रमुखांना कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावात बस पोहेचावी यासाठी बस आगाराचे प्रयत्न सुरू आहेत. वास्तविक सकाळी सहा ते दहा या वेळेत प्रत्येक गावापर्यंत शालेय विद्यार्थ्यांना मुख्य शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी बसची आवश्यकता आहे.
नवीन आराखडय़ात बसस्थानकाचा अधिक विस्तार
हे बस आगार व बसस्थानक हायटेक करण्यासाठी राज्य परिवहन खात्याकडून साडेसहा कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत बस स्थानकाच्या समोरील भागात सर्व सोयींनीयुक्त कक्ष उभारला जाणार आहे. बसवेश्वर पुतळाच्या बाजूला असलेल्या कंपाऊंडला लागून बसस्थानकाची नव्याने निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे हायटेक बसस्थानक पूर्ण झाल्यानंतरच या ठिकाणी सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. पण या कामाला सुरुवात होण्यास दिरंगाई होत असल्याने प्रवासीवर्ग हायटेक बस स्थानकाच्या प्रतीक्षेत आहे.
बस स्थानकात चौकशी कक्ष नसल्याने गैरसोय

येथील बसस्थानक व आगाराला 2002 मध्ये मंजुरी मिळाली खरी, पण गेल्या 20 वर्षात या आगाराचा अपेक्षित विस्तार झाला नाही. हायटेक बसस्थानक लवकरच होईल, पण सध्या बसस्थानकात चौकशी कक्ष नसल्याने प्रवासीवर्गाची गैरसोय होत आहे. प्रवासीवर्गाला बसेसचे वेळापत्रक विचारण्यासाठी बस आगारात जावे लागत आहे. यासाठी बस स्थानकाच्या ठिकाणी एक कायमस्वरुपी चौकशी कक्ष कार्यरत असणे आवश्यक आहे. त्याची आगारप्रमुखांनी व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जॅकी फर्नांडिस यांनी केली.
हायटेक बसस्थानकाची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण
तालुक्मयाच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळय़ा खात्यांकडून निधी मिळविण्यासाठी आपला प्रयत्न आहे. खानापूर बसआगार व बसस्थानक हायटेक करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. आपण आमदार झाल्यापासून हे काम तातडीने हाती घेण्यासाठी प्रयत्न हाती घेतले आहेत. पण राजकीय हस्तक्षेपामुळे या आगाराचे काम रखडले आहे. आता ते कामही मार्गस्थ झाले असून निधी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन बसस्थानकाच्या कामकाजाला सुरुवात होणार, यात शंका नाही.
-आमदार अंजली निंबाळकर
तालुक्यात बसेस धावण्याचे 58 शेडय़ुल कार्यरत
खानापूर बस आगारात केवळ 62 बसेस आहेत. या 62 बसेसमधून तालुक्मयाच्या ग्रामीण भागाची सेवा जोडण्यासाठी 58 शेडय़ूल तयार करण्यात आले आहेत. अद्याप जवळपास आठ ते दहा नवीन बसची गरज आहे. शिवाय खानापुरात आतापर्यंत 198 बसवाहक व चालक सहकर्मचारी वर्गाचा स्टाफ आहे. अजून जवळपास 15 वाहक व चालक अपेक्षित आहेत. यासाठीही शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
-आगार प्रमुख आनंद शिरगुप्पीकर









