विभागीय क्रीडा संकुलातील वादग्रस्त जलतरण तलावासाठी अखेरचा उपाय, बेंगळूरच्या कंपनीकडून तलावाची पाहणी,
संग्राम काटकर कोल्हापूर
पद्माळा येथील विभागीय क्रीडा संकुलातील सांडपाणी मिसळण्याच्या कारणावरुन बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या जलतरण तलावाचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल समितीने एक अखेरचा उपाय म्हणून नामी शक्कल लढवली आहे. जूना तलाव बुजवण्याऐवजी जलतरण तलावाच्या आकाराचा मेटल टँक बनवून घेऊन तो तलावात बसण्याचा समितीने निर्णय घेतला आहे. तलाव बांधणीत गलथानपणाचे क्रीडा संघटनांकडून होत असलेले आरोप आणि संकुलातील अन्य जागेत तलाव बांधणीस येणारा चार-पाच कोटी रुपयांचा खर्च रोखण्यासाठी जुन्याच तलावात मेटल टँक बसवण्याचे पाऊल उचलल्याचे संकुलाच्या कामकाजाचे कार्यासन प्रमुख शंकर भास्करे यांनी सांगितले.
विभागीय क्रीडा संकुलातील 50 मीटर लांबीचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावात गेल्या 7 वर्षांपासून संभाजीनगर परिसरातून येणाऱ्या नाल्याचे सांडपाणी पाणी झिरपत आहे. अनेक उपाय करुनही सांडपाणी झीरपणे थांबलेच नाही. दुसरीकडे संकुलाचे ठेकेदार व आर्किक्टेट यांच्या चुकीच्या निर्णयामुळे जलतरणतलाव नाला परिसरात बांधला गेल्याचा आरोप करत तलावाचा खर्च वसुल करुन घेण्याचा आरोप विभागीय क्रीडा संकुल समिती, क्रीडा संघटना व खेळाडूंनी आंदोलने केली. ही आंदोलने पाहून क्रीडा संकुल समितीच्या पायाखालची वाळू सरकली. समितीने अनेक उपाय करुनही तलावात झिरपणारे सांडपाणी रोखता आले नाही. एक जालीम उपाय करण्यासाठी आयआयटी इन्स्टिट्युटच्या तज्ञांना संकुलात बोलवले. त्यांनी पाहणी करुन तलावात येणारे सांडपाणी रोखणे अशक्य असल्याचे सांगितले. त्यामुळे समितीच्या पायाखालची वाळूच सरकली. तलाव बांधणीवर खर्च केलेले पावणे चार कोटी पाण्यात जाणार आहे, हे सिद्ध झाले. याचवेळी तलाव बांधणीच्या मोठ्या खर्चाला कोण जबाबदार असे विचार विभागीय क्रीडा संकुल समितीसह ठेकेदार व आर्किटेक्टकडूनच बांधकामात गलथानपणा केल्याचा आरोप क्रीडा संघटनांसह क्रीडा क्षेत्रातील जाणकार करु लागले.
त्यामुळे हतबल समितीने अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांना तलावाचा प्रश्न निकालात काढण्याचे गाऱ्हाणे घालत तलाव बांधणीत यावेळी क्रीडा संकुल प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या जागेत नवीन तलावासह बहुउद्देशीय हॉल आणि मुलांसाठी वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेतला. पण सव्वा वर्ष उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी नाही. अशातच आता अखेरचा उपाय म्हणून विभागीय क्रीडा संकुल समितीने मुळतलावातच मेटल टँक बसवण्याची पर्याय शोधला आहे. काहीच दिवसांपूर्वी बेंगळूरच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी मेटल टँक बसवण्यासाठी तलावाची पाहणी आहे. आता कंपनीकडून मेटल टँकसाठी काय करावे लागेल हे सांगितले जाईल. त्यानुसार खर्चाचे इस्टिमेट बनवून ते सतेज पाटील यांच्यामार्फत शासनाकडे पाठवले जाईल. सोबत संकुलात हॉल आणि खेळाडूंसाठी वसतीगृह उभारण्यासाठीचा प्रस्तावही दिला जाईल. तेंव्हा आता निधी मिळवून कामाला केंव्हापासून सुरुवात होते, याचीच प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मेटल टँकखालून नाल्याचे पाणी चॅनेलला जोडणार असुन मुळच्या जलतरण तलावात मेटल टँक बसवताना संभाजीनगर परिसरातून येणाऱ्या सांडपाण्याचा मेटलशी संपर्क येऊ दिला जाणार नाही. शिवाय हे सांडपाणी मेटल टँकच्या खालून वळवून घेऊन जयाप्रभा स्टुडीओकडे एका चॅनेलद्वारे नेऊन तेथील गटारांना सोडले जाईल. या कामासाठी अपेक्षीत निधी मिळवून तलाव समस्यामुक्त करण्यासाठी विलंब केला जाणार नाही असे विभागीय क्रीडा संकुल कामकाजाचे कार्यासन प्रमुख शंकर भास्करे यांनी सांगितले.