ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशातील अयोध्येत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विश्वविक्रमी दीपोत्सव होणार आहे. यासाठी अयोध्या नगरी सज्ज आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या दीपोत्सवाच्या पाचव्या वर्षी रामपदीवर एकाच वेळी सात लाख ५१ हजार दिवे प्रज्वलित करून अयोध्येत विश्वविक्रम रचण्याची तयारी केली आहे. यासाठी अवध विद्यापीठाची संपूर्ण टीम दोन दिवस मेहनत घेत आहे. मंगळवारी रामपडीतील घाटांवर नऊ लाख दिवे लावण्यात आले आहेत. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी आदित्यनाथ सरकारचा हा शेवटचा मोठा कार्यक्रम असण्याची शक्यता आहे.
बुधवारी हनुमान जयंतीला दीपोत्सवाचा मुख्य उत्सव साजरा होणार आहे. यावेळी सात लाखाहून अधिक दिवे लावले जाणार आहेत. तर या दीपोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह केनिया, व्हिएतनाम आणि त्रिनिदाद-तुबागो येथील राजनैतिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.