श्रीमती जयमाला भोसले यांचे निधन
प्रतिनिधी/ कराड
सहकार, सामाजिक, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मातोश्री श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले (वय 89) यांचे सोमवारी 1 रोजी रात्री 11.45 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. कृष्णा परिवाराच्या ‘आईसाहेब’ हरपल्या असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून कृष्णाकाठावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी 2 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास के. सी. टी. कृष्णा स्कूलच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोल्हापुरातील कर्नल नानासाहेब दत्ताजीराव इंगळे यांच्या कन्या असलेल्या जयमाला यांचा जन्म 13 डिसेंबर 1932 रोजी झाला. हायर सेकंडरीपर्यंत शिक्षण घेतल्यावर 19 मे 1952 रोजी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर जयमाला भोसले (आईसाहेब) यांनी आप्पासाहेबांच्या प्रत्येक कार्याला पाठबळ देत, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलली. या भागात समृद्धी नांदावी, यासाठी आप्पासाहेब कृष्णा कारखान्यासह अन्य सहकारी संस्थांच्या उभारणीत तसेच सार्वजनिक कार्यात सतत व्यस्त असत. अशावेळी एक गृहिणी म्हणून कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी त्यांनी पेलली. कौटुंबिक जबाबदारी जपतानाच आपल्या 2 मुलांचे आणि 2 मुलींचे संगोपन व पालनपोषण समर्थपणे केले. याचवेळी त्यांनी आप्पासाहेबांच्या शैक्षणिक कार्यात सक्रीय सहभाग घेत, शैक्षणिक कामामध्ये प्रत्यक्ष योगदान दिले. कृष्णा हॉस्पिटलसह कृष्णा इंग्लिश मिडियम स्कूल, कृष्णा विद्यापीठ या संस्थांच्या वाटचालीत कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त या नात्याने त्यांचे योगदान महत्वाचे राहिले आहे. किंबहुना आप्पासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाबरोबरच आप्पासाहेबांवर प्रेम करणाऱया कृष्णाकाठच्या प्रत्येक कार्यकर्त्यांला मायेची सावली दिली.
श्रीमती जयमाला भोसले (आईसाहेब) गेले काही दिवस आजारी होत्या. सोमवारी रात्री 11.45 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. के. सी. टी. कृष्णा स्कूलच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. सुरेश भोसले, पृथ्वीराज भोसले, मुलगी सौ. उज्वला घाटगे, पद्मजा शिर्के, सून सौ. उत्तरा भोसले, सौ. वसुंधरा भोसले, जावई राजेंद्रसिंह घाटगे, नातू डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, डॉ. जयवर्धन भोसले, नातसून सौ. गौरवी भोसले असा मोठा परिवार आहे.
बुधवारी रक्षाविसर्जन
स्व. जयमाला जयवंतराव भोसले यांचे रक्षाविसर्जन बुधवार 3 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता कोयना वसाहतीतील केसीटी कृष्णा स्कूलच्या प्रांगणात होणार आहे.