6 व 7 तारखेला किल्ले प्रदर्शन – मावळय़ांनी तयार केल्या 50 किल्ल्यांच्या प्रतिकृती
चंद्रकांत देवरुखकर/ सातारा
दीपावली हा दिव्यांचा सण. लखलखणाऱया दिव्यांनी मानवी जीवनातील अंधकार दूर करुन जीवनाकडे आनंदाने पाहण्याची दृष्टी देणाऱया दीपावलीत मराठी मातीतील बाल मावळे किल्ले उभारुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहासही जागवतातच. मात्र, सातारा तालुक्यातील परळी खोऱयातील अंबवडे बुद्रूtक हे गाव गेल्या दहा वर्षांपासून किल्ल्यांचे गाव म्हणून प्रसिध्दीस आले असून यावर्षी देखील तिथे तब्बल 50 किल्ल्यांच्या प्रतिकृती मावळय़ांनी साकारल्या आहेत.
गतवर्षी कोरोना संसर्गामुळे किल्ल्यांचे गाव असलेल्या अंबवडे गावाला त्यांचा किल्ल्यांचा दुर्गोत्सव साजरा करताना अडचणी आल्या. मात्र, यावर्षी कोरोना संसर्ग कमी झाला असल्याने अंबवडेत गेल्या 15 दिवसांपासून छोटय़ा मंडळीपासून युवक व ग्रामस्थांनी परिश्रम घेत पुन्हा किल्ल्यांचे गाव साकारले आहे. साल्हेर, राजगड, विशाळगड, पन्हाळा, रायगड, अजिंक्यतारा, सिंधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी जंजिरा किल्ला पाहायचेत? मग तर चला सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुकमध्ये असेच म्हणावे लागते. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे व इतिहासाचे साक्षीदार असलेले किल्ले पाहण्यास मिळतीलच, त्याबरोबर त्याचा इतिहास ही ऐकायला मिळेल अशी तब्बल 50 किल्ल्यांची प्रतिकृती सादर करण्याची किमया येथील बालमावळ्यांनी साकारली आहे.
दिवाळी म्हटलं की रांगोळी कंदील, फटाके, फराळ अशा सर्व गोष्टीबरोबर आणखी एक वैशिष्ट म्हणजे किल्ले दिवाळीच्या सुट्टीत घराच्या आवारात किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या जुन्या परंपरेकडे सध्याच्या स्मार्टफोन युगात दुर्लक्ष झाले आहे. मात्र, सातारा तालुक्यातील अंबवडे बु गावमध्ये ही परंपरा आजही सुरू आहे. गेल्या 10 वर्षांपासून या परंपरेला व्यापक स्वरुप आले असून अंबवडेकरांसाठी हा खऱया अर्थाने दुर्गोत्सवच असतो. हा किल्ल्यांचा उत्सव पाहण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर जिह्यातील लोक गर्दी करत असतात. त्यामुळे गावाला ऐन दिवाळीत यात्रेचे स्वरूप येत आहे..
एक ते दोन गुंठय़ात किल्ल्यांच्या प्रतिकृती
गावात दरवर्षी साधारण 50 ते 60 किल्ले. ते ही मोठय़ा प्रतिकृतीचे म्हणजे किती तर 1 ते 2 गुंठे तसेच पूर्ण शेतात एवढया मोठय़ा आकारात किल्ले उभारले जातात. किल्ला करताना किंवा गडकोट किल्ला उभा करताना तो एखाद्या गड दुर्गासारखा हुबेहूब व्हावा असा अट्टाहास नसतो मात्र तो किल्ला उभा करण्यापाठीमागची भावना मात्र राजगडला टक्कर देईल माझा बनवलेला दुर्ग अशी असते.
किल्ल्यांच्या प्रतिकृती देतात इतिहासाची साक्ष
किल्ला बनवताना मुलं कमीत कमी खर्च करत असतात, म्हणजे तटबंदी बनवताना माती, शेण राख, भुसा चा वापर करून केलेले आहे. तर सैनिक, घर, मंदिर पुष्टयाची बनवलेली आहेत. साल्हेर, राजगड, विशाळगड, पन्हाळा, रायगड, अजिंक्यतारा, सज्जनगड यांसारख्या डोंगरी किल्ल्यांबरोबरच सिंधुदुर्ग, जंजिरा सारखे सागरी किल्ले, देवगिरीसारखा मैदानी किल्ला देखील हुबेहूब साकारले असून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व व्यवस्थापन कौशल्याची साक्ष देतात.
6 व 7 रोजी किल्ल्यांचे प्रदर्शन
किल्ल्यांच्या देखाव्याबरोबरच त्या किल्ल्यांच्या इतिहासाची येथील बालमावळे सांगत असतात. त्याला गीत, संगीताचीही जोड दिलेली असते. किल्ल्यांच्या प्रतिकृतीसोबत प्रत्येक ठिकाणी सामाजिक संदेश ही प्रदर्शित केला आहे. किल्ले प्रदर्शन 6 आणि 7 तारखेला असून सर्वांनी सायंकाळी भेट द्यावी आणि आमच्या बालमावळ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन राजेश जाधव, सुमित जाधव व अंबवडेकर ग्रामस्थांनी केले आहे.








