ऑनलाईन टीम / श्रीनगर
भारत पाकिस्थान क्रिकेट टी-२० विश्वचषक सामन्यानंतर जम्मु – काश्मिरच्या काही भागात जल्लोष करण्यात आला होता. या पार्श्वभुमीवर जम्मू आणि काश्मीरमधील भाजपचे ज्येष्ट नेते माजी खासदार विक्रम रंधावा यांनी मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केले आहे. या प्रकरणी रंधावा यांच्यावर एफआयआर नोंदवला आहे. वकील मुझफ्फर अली शाह यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर बहू फोर्ट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंधावा यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ही व्हायरल झाला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार भारत पाक टी -20 क्रिकेट सामन्यातील पाकिस्तानच्या विजयानंतर काश्मिरच्या अनेक भागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. यावर विक्रम रंधवा यांनी आक्षेपार्ह भाष्य केले. यावर जम्मू-काश्मीर भाजपने देखील रंधावा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असुन रंधावा यांनी केलेले हे विधान पक्षश्रेष्टींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच रंधावा यांनी वापरलेली भाषा संपुर्णत: चुकीची असल्याचे भाजपचे रविंदर रैना यांनी म्हटले आहे.