ऑनलाईन टीम / लखनौ
गेले काही दिवस उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसने अनेक लक्षवेधी घोषणा केल्या आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली या निवडणूकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस आपली रणनीती आखत असुन या रणनीतीचा भाग म्हणुन अनेक घोषणा केल्या जात आहेत. यामध्ये एकुण विधानसभा जागांपैकी ४० टक्के जागा महिला लढतील ही घोषणा लक्षवेधी ठरली आहे.
आज दि.२५ आक्टोबर रोजी प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथून काँग्रेसच्या “प्रतिज्ञा यात्रे” ला झेंडा दाखवला. यावेळी गांधी यांनी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल, तसेच राज्यातील नागरीकांना १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
याचबरोबर प्रियंका गांधी यांनी ट्विट करत कोरोना काळात उत्तर प्रदेशची आरोग्य यंत्रणा ढासळल्याची स्थिती प्रत्येक नागरीकाने पाहिली आहे. राज्य शासनाच्या उदासिन भुमिकेचा परिणाम नागरीकांच्यावर झाला आहे. त्यामुळे जेव्हा उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेस सरकार येईल तेव्हा कोणत्याही आजारावर मोफत उपचार केले जातील यासाठी १० लाख रुपयांपर्यंतचा खर्च राज्य शासन उचलणार आहे. असे प्रियंका यांनी स्पष्ट केले आहे. या बरोबर गांधी यांनी सामान्य नागरीकांना केंद्र मानत अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामुळे याकडे विरोधी पक्ष म्हणुन भाजप नेमकी काय भुमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.