दीया मुटियारा सुकमावती यांची धर्मांतराची घोषणा- 26 रोजी होणार सोहळा
वृत्तसंस्था/ जकार्ता
जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांची मुलगी दीया मुटियारा सुकमावती यांनी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याची घोषणा केली आहे. त्यांना सुकमावर्ती सुकर्णोपुत्री या नावाने देखील ओळखले जाते.
26 ऑक्टोबर रोजी बाली अगुंग सिंगराजामध्ये शुद्धी वधनी नावाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती धर्मांतर सोहळय़ाचे प्रभारी आर्य वेदकर्ण यांनी दिली आहे. धर्मांतराच्या दिवशीच सुकमावती यांचा 70 वा जन्मदिन आहे.
इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष सुकर्णो आणि त्यांच्या पत्नी फातमावती यांच्या सुकमावती या तिसऱया कन्या आहेत. तसेच त्या इंडोनेशियाचे पाचवे अध्यक्ष मेगावती सोकर्णोपुत्री यांच्या बहिण आहेत.
आजीकडून प्रेरणा
इंडोनेशियन नॅशनल पार्टीच्या संस्थापिकेने हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय स्वतःच्या दिवंगत आजी इडा आयु न्योमन राय श्रीम्बेन यांच्यापासून प्रभावित होत घेतला आहे. सुकमावती यांनी हिंदू धर्मशास्त्राचा योग्यप्रकारे अभ्यास केला आहे. बालीच्या दौऱयांदरम्यान सुकमावती हिंदू धार्मिक सोहळय़ांमध्ये सामील व्हायच्या आणि हिंदू धार्मिक व्यक्तिमत्वांसोबत संवाद साधत होत्या. हिंदू धर्म स्वीकारल्यावर त्या कदाचित बाली येथेच कायमस्वरुपी वास्तव्य करू शकतात.
कुटुंबीयांची सहमती
सुकमावती यांच्या हिंदू धर्म स्वीकारण्याच्या योजनेला त्यांचे बंधू आणि भगिनींनी समर्थन दर्शविले आहे. तसेच त्यांच्या अपत्यांनीही सहमती दिली आहे. विवाहाच्या 10 वर्षांनी 1984 मध्ये राजकुमार आणि सुकमावती यांचा घटस्फोट झाला होता.