शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच, नागरिकांमध्ये घबराट
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील किल्ला भाग येथे भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 74 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत मालन मल्लाप्पा मलकणावर वय 55 यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच शहरातील रमा उद्यान येथे भरदिवसा बंगला फोडून 19 तोळे दागिने लंपास केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा किल्ला भाग येथे मध्यवस्तीत भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
किल्ला भागातील दत्त मंदिराजवळ राहण्यास असलेल्या मालन मलकणावर या शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी त्या घरी परत आल्या असता त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटल्याचा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता चोरट्यांनी कपाटातील सुमारे 60 हजार रुपयांची रोख रक्कम आणि अर्धा तोळे सोन्याचे दागिने असा 74 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत मलकणावर यांनी मिरज शहर पोलिसात चोरीची फिर्याद दिली आहे.
शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चारच दिवसांपूर्वी रमा उद्याने येथे बंद बंगला फोडून चोरट्यांनी 19 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. अद्याप या चोरीचा छडा लागला नसताना पुन्हा भरवस्तीत भर दिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या चोरट्यांनी पोलिसांसमोररही आव्हान उभे केले आहे. भरदिवसा चोरांचा घटना घडूनही चोरटे पोलिसांच्या हाती लागत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी पथके तैनात करून तसेच रात्रीच्या सुमारास गस्त वाढवून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.