प्रतिनिधी/ मडगाव
गोवा फॉरवर्ड पक्ष लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये विलिन केला जाणार असल्याची चर्चा रंगात आली असतानाच याला नाटय़मय कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल शनिवारी काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव हे गोव्यात दाखल झाले व त्यांनी गोवा फॉरवर्डकडे युतीच्यासंदर्भात बोलणी केल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
गेले काही दिवस काँग्रेस पक्ष, गोवा फॉरवर्डकडे युती करण्याच्यादृष्टीने अंतर्गत विचाराधीन होता. मात्र, गोवा फॉरवर्डने तृणमूल काँग्रेसकडे बोलणी करून त्या पक्षात प्रवेश करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली होती. गोवा फॉरवर्डचे तीन आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्यास तृणमूलचे गोव्यात वजन वाढले असते. त्याचा परिणाम काँग्रेस पक्षावर झाला असता. तृणमूलचा संभाव्य धोका ओळखून काँग्रेस पक्षाने आपली भूमिकाच बदलली आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडूराव हे काल गोव्यात पोहचल्यावर त्यांनी गोवा फॉरवर्डकडे युतीच्यासंदर्भात बोलणी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाकडे युतीची बोलणी सुरू झाल्याने, गोवा फॉरवर्डच्या राज्य कार्यकारिणीची काल शनिवारी होणारी महत्त्वपूर्ण बैठक होऊ शकली नाही.
या नव्या राजकीय घडामोडीत तृणमूल काँग्रेसला काहीसा धक्का बसल्यात जमा आहे. कारण तीन आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता तर त्यांचे गोव्यात वजन वाढले असते. दरम्यान, गोव्यातील एकूण सात ते आठ आमदार तृणमूलच्या संपर्कात असल्याची माहिती तृणमूलच्या अधिकृत सूत्रांनी दिली. हे आमदार कोण हे सांगण्यास नकार दर्शविला तरी येत्या काही दिवसात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असे या सूत्रांनी सांगितले.
गिरीश चोडणकर यांना युती अमान्य
दरम्यान, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अचानक शनिवारी दिल्लीत जाऊन पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी व गोवा निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम यांची भेट घेऊन गोव्यातील नव्या राजकीय घडामोडींची कल्पना दिली. गिरीश चोडणकर हे गोवा फॉरवर्डशी युती करण्यास राजी नसल्याने हा मुद्दाही त्यांनी राहुल गांधी व चिदंबरम यांच्याकडे मांडला. तर दुसऱया बाजूने दिनेश गुंडूराव युतीची बोलणी करण्यासाठी गोव्यात पोहोचले व त्यांनी चर्चेलाही प्रारंभ केला आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









