36 बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा : स्मार्ट बसथांब्यांवरही डिजिटल फलक लावण्यात येणार
प्रतिनिधी /बेळगाव
बस चुकल्यास पुढील बस केव्हा येणार? हे प्रवाशांना मोबाईलवरही आता सहज समजू शकणार आहे. परिवहन मंडळाने शहरातील 36 बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली असून त्यामुळे प्रवाशांना बसचे वेळापत्रक समजण्यास मदत होणार आहे. येत्या काही दिवसांत इतर सर्व बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यामुळे बसप्रवास सोयीचा होणार आहे.
राज्य परिवहन मंडळाने खासगी बस व्यवसायाच्या तुलनेत बससेवा पुरविण्यासाठी अत्याधुनिक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता बसमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. गतवषी बेंगळूर शहरातील काही बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. शहरातील 10 स्मार्ट बसथांब्यांवर डिजिटल डिस्प्ले फलक लावण्यात आले आहेत. येत्या काळात इतर स्मार्ट बसथांब्यांवरही डिजिटल फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना बस किती वेळेत पोहोचणार आहे, हे समजण्यास मदत होणार आहे.
बसचे ठिकाण, अधिकृत थांबे, अपघात अशा विविध घडामोडींवर परिवहनला एकाच ठिकाणाहून लक्ष ठेवता येणार आहे. जीपीएसमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्नसुद्धा परिवहनचा आहे. त्यासाठी चाचण्या सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर ऍपच्या माध्यमातून प्रवाशांना या सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहरातील काही बसथांब्यांवर लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर जीपीएस सुविधा सुरू नाही. मात्र येत्या काळात सर्व बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविल्यानंतर डिजिटल फलकावरदेखील बसची माहिती झळकणार आहे.
बऱयाचवेळा बसचालक बसथांब्यांवर बस न थांबवताच पुढे जातात. त्यामुळे अशा बसचालकांच्या मनमानीलाही जीपीएसमुळे चाप बसणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जीपीएस महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून यंत्रणा…
प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून शहरातील 36 बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. इतर बसमध्येदेखील लवकरच जीपीएस कार्यान्वित केले जाणार आहे. शहरातील स्मार्ट बसथांब्यांवर उभारलेल्या डिजिटल फलकांवर बसची ऑनलाईन माहिती उपलब्ध होणार आहे.
-पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रण अधिकारी-केएसआरटीसी)









