क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोव्याची अव्वल जलतरणपटू संजना प्रभुगावकर हिने बेंगलोरात सुरू असलेल्या राष्ट्रीय सब-ज्युनियर आणि ज्युनियर जलतरण क्रीडा स्पर्धेत गोव्याला आणखी एक पदक मिळवून दिले. या आधीच प्रत्येकी एक सुवर्णपदक आणि रौप्यपदक जिंकलेल्या जिंकलेल्या संजनाने काल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मुलींच्या गट एकमधील 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक प्राप्त करून दिले.
या स्पर्धेचे आयोजक कर्नाटक जलतरण संघटनेने अखिल भारतीय जलतरण महासंघाच्या सहकार्याने केले आहे. संजनाने रौप्यपदक गोव्याला मिळवून देताना 1ः08ः48 अशी वेळ दिली. कर्नाटकच्या निना व्यंकटेशने 1ः06ः65 अशी वेळ देत सुवर्ण तर महाराष्ट्रच्या पलक धामीने 1ः08ः81 अशी वेळ देत ब्राँझपदक मिळविले. बेंगलोरात ग्रेफ्री जलतरण केंद्रात भुषणकुमार यांच्या प्रशिक्षणाखाली प्रशिक्षण घेणाऱया संजनाने यापूर्वी 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण तर 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक मिळविले आहे.









