उदय मडकईकर, मिनीन डिक्रूझ यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
पणजी शहरातील विविध प्रश्न यावर माजी महापौर उदय मडकईकर व माजी नगरसेवक मिनीन डिक्रूझ यांनी काँग्रेस पक्षातर्फे आवाज उठवला असून तारांकित हॉटेल्समधील ग्राहकांना समूहाचे दर्शन व्हावे म्हणून झाडे नष्ट करणे तसेच भराव घालण्याची कामे बेकायदेशीरपणे होत असल्याचा आरोप केला आहे.
पणजीत काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पणजीतील विविध प्रश्न उपस्थित केले आणि त्याकडे सरकारचे, पणजीच्या आमदाराचे लक्ष वेधले. सरकारने मतदान यंत्रे कांपाल पणजी येथील इनडोअर स्टेडीयममध्ये ठेवल्याने ते बंद करण्यात आले आणि खेळाडुंची निराशा झाली. त्यांना खेळायला मिळत नाही म्हणून यंत्रे तेथून हलवावीत आणि इनडोअर स्टेडीयम खेळाडुंसाठी खुले करावे अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार आता ती यंत्रे आल्तिनो पणजी येथील सरकारी तंत्रनिकेतनमध्ये हलवण्यात येणार असून स्टेडियम खेळाडुंना खुले होणार आहे.
कांपाल येथील स्विमिंग पूल दुरुस्तीच्या नावाखाली गेली दोन वर्षे बंद आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय होत असून लोकांना म्हापसा पेडे येथे लांब असलेल्या पुलाकडे जावे लागते. भिकाऱयांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ते भिकारी म्हणजे अंमलीपदार्थ व्यवहाराचे रॅकेट आहे. आपण महापौर असताना कांपाल मैदानाकडील भिकारी अड्डा हा ड्रग्जचा अड्डा म्हणून उघडकीस आणून तो उद्ध्वस्त केला होता. तेथे तो पुन्हा सुरु झाला असून तो पणजीत मनपाने मोडून काढावा, असे त्यांनी सुचवले.
पणजी स्मार्ट सिटी म्हणून ढोल बडवले जात असून रस्त्यांची अवस्था बिकट आहे. ते स्मार्ट कधी होणार अशी विचारणा डिप्रुझ यांनी केली. पणजीच्या आमदारांनी या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले.









