कोरोनाकाळानंतर देशांतर्गत उद्योग क्षेत्रात आता आर्थिक-व्यावसायिक स्थिरता येण्याबरोबरच व्यवसाय क्षेत्रात रोजगारपूरक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार व्यावसायिकदृष्टय़ा मोठय़ा असणाऱया सुमारे 34 टक्के कंपन्यांनी यावषीच्या एप्रिल-जून या तिमाही दरम्यान कर्मचाऱयांची नव्याने भरती करण्यासाठी विशेष सक्रियता दाखविली आहे हे चित्र गेल्या वर्षभरात प्रथमच दिसून आले असून त्यामुळे व्यवसाय, रोजगार या उभय संदर्भात आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
कर्मचाऱयांच्या निवडीच्या संदर्भात विशेष भूमिका असणाऱया ‘टीम लीज’ या व्यवस्थापन कंपनीतर्फे करण्यात आलेल्या रोजगार विषयक सर्वेक्षणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, नवीन आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच एप्रिलपासून विविध कंपन्या आपापल्या व्यवसायासाठी कर्मचाऱयांची निवड करण्यासाठी प्रामुख्याने सरसावल्या आहेत. या सर्वेक्षणानुसार गेल्या चार महिन्यांमध्ये उद्योग आणि कंपन्या या कोरोना संकटावर मात करून व्यावसायिकदृष्टय़ा नव्याने सावरण्याच्या अवस्थेत आणि मानसिकतेत आल्या आहेत.
या कर्मचारी रोजगार विषयक सर्वेक्षणानुसार त्यामध्ये 21 प्रकारच्या व्यवसाय-उद्योगांमधील 600 कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये लघू उद्योगांसह मध्यम व मोठय़ा उद्योगांचा समावेश करण्यात आला होता. मुख्य म्हणजे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या या उद्योगांमध्ये विविध राज्यांमधील उद्योगांचा समावेश करण्यात आल्याने त्याला सर्व समावेशक असे स्वरुप प्राप्त झाले होते.
सर्वेक्षण अहवालात प्रामुख्याने नमूद करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार प्रतिसाद देणाऱया 34 टक्के कर्मचाऱयांनी सद्यस्थितीत कर्मचाऱयांची निवड करण्याला त्यांच्या दृष्टीने व्यावसायिक प्राधान्य असल्याचे नमूद केले आहे. जानेवारी, मार्च 2021 या गेल्या आर्थिक वर्षातील अखेरच्या तिमाहीत हीच आकडेवारी 26 टक्के होती हे या संदर्भात उल्लेखनीय आहे. 2020 मध्ये कर्मचारी भरतीची सरासरी टक्केवारी 20 टक्के होती हे पाहिले म्हणजे नव्या वा प्रस्तावित रोजगारसंधींचे स्वरुप आणि महत्त्व स्पष्ट होते.
टीम लीजच्या या रोजगार सर्वेक्षणातील एक महत्त्वपूर्ण तथ्य म्हणजे कोरोना-1 नंतर म्हणजेच सुमारे एक वर्षापूर्वी कंपन्यांनी कर्मचाऱयांची निवड करण्यासाठी जी तयारी व प्रयत्न केले त्यापेक्षा या कंपन्या सध्याचे त्यांचे प्रयत्न अधिक गांभीर्याने करीत असल्याचे दिसून येते. यामागे अर्थातच सध्याची व अपेक्षित पूरक व्यावसायिक स्थिती हेच मुख्य कारण आहे.
सर्वेक्षणाचा कालावधी व पार्श्वभूमी यांचा अभ्यास करता लक्षात येणारी बाब म्हणजे त्यामागे राष्ट्रीय पातळीवरील अर्थकारण व सरकारची लवचिक धोरणे ही दोन कारणे प्रामुख्याने दिसून आलीत. त्यातही देशपातळीवर ‘जीडीपी’ म्हणजेच सकल घरेलु उत्पादन, उद्योग, व्यवसायात नजिकच्या भविष्यात येऊ घातलेल्या तेजीचे अंदाज सरकारतर्फे विविध योजना, सहाय्यराशी व देय रकमांचे तातडीने व कालबद्ध स्वरुपात झालेले वितरण व त्यामुळे एकूणच आर्थिक-व्यावसायिक क्षेत्राला लाभलेले सकारात्मक आयाम ही स्थिती निश्चितच पूरक ठरली आहे.
मध्यंतरी कोरोनाच्या तिसऱया लाटेची भीतीयुक्त चर्चा सर्वत्र सुरू होती व त्याला अर्थातच उद्योग, व्यवसाय क्षेत्र अपवाद नव्हते. मात्र कोरोना 2 काळात ज्या पद्धतीने केंद्र व राज्य सरकार, शासकीय विभाग, आरोग्य क्षेत्र, सेवाभावी संस्था, समाजसेवक व जबाबदार नागरिकांनी जे धैर्यपूर्वक प्रयत्न सातत्याने केले व कोरोनाच्या दुसऱया लाटेवर नियंत्रण प्राप्त केले त्याचा सकारात्मक परिणाम देशातील उद्योग विश्वावर झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.
सर्वेक्षणातील सहभागी कंपनी व्यवस्थापकांच्या मते कोरोना काळात त्यांना कठीण व मोठय़ा आव्हानपर स्थितीत आणि जोखमीसह काम करावे लागले. त्यांना व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांशी संबंधित नव्या आयामाचा पण आता चांगला सराव झाला असून नजिकच्या भविष्यात कोरोना वा त्यासारख्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी तेवढय़ाच कार्यक्षम सहकाऱयांची त्यांना प्रकर्षाने जाणवू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रचलित व प्रस्तावित नोकरी- रोजगार संधींच्या संदर्भात सांगायचे झाल्यास वैद्यक व आरोग्य सेवा क्षेत्राचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कोरोनादरम्यान व नंतरच्या काळात उत्पन्न झालेल्या अथवा उदभवलेल्या सार्वजनिक गरजांपोटी असे होणे अपरिहार्य ठरते. यालाच जोड मिळेल ती औषध निर्मिती, ई-कॉमर्स, रिटेल विक्री व्यवस्थापन, दूरसंचार सामान- सामुग्री वाहतूक व माहिती तंत्रज्ञान आणि संगणक सेवा क्षेत्रातील रोजगार संधींची.
यासंदर्भात ‘नोकरी जॉब’ या रोजगार विषयक पोर्टलच्या माध्यमातून संकलित व उपलब्ध माहिती व आकडेवारीनुसार मे 2021 मध्ये माहिती तंत्रज्ञान व संगणकशास्त्र क्षेत्रातील रोजगारांमध्ये एका महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच 14 टक्क्मयांनी वाढ झाली. यात जूनमध्ये आणखी 5 टक्क्मयांनी वाढ झाली हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. या वाढत्या रोजगार संधींच्या टक्केवारीमुळे देशपातळीवरील रोजगार संधींच्या संदर्भात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र कोरोनापूर्व काळातील वाढत्या रोजगारसंधींची पातळी सहजपणे गाठू शकेल हे स्पष्ट होते.
नोकरी- रोजगारासाठी उमेदवारांच्या संदर्भात व त्यांच्या दृष्टीकोनातून पसंतीचे क्षेत्र म्हणून गेल्या वषी ई कॉमर्सने पहिले स्थान मिळविले होते. कोरोनाचा प्रभाव प्रदीर्घकाळपर्यंत कायम राहून घरून काम करण्यावर कंपनी कर्मचारी या उभयतांचा भर अद्यापही असल्याने ई कॉमर्सची ही पसंती आगामी काळात कायम राहील. झोमॅटो सारख्यांच्या आयपीओ सारख्या यशस्वी पुढाकारामुळे ‘ई कॉमर्स’चे आर्थिक स्थैर्य निश्चितच अधोरेखित झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गेली दोन वर्षे कोरोना काळात सर्वाधिक विपरित परिणाम झालेल्या हॉटेल, पर्यटन, प्रवासी वाहतूक यासारख्या क्षेत्रातील कर्मचाऱयांना ‘ई कॉमर्स’मधील रोजगारांच्या सुगीने नक्कीच मदतीचा हात व मोलाची साथ दिली आहे.
असे असले तरी प्रचलित कोरोनाकाळात नोकरी रोजगार नव्याने शोधणाऱया वा आपल्या नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱया कर्मचारी- उमेदवारांनी काही बाबींचा अंदाज घेऊन त्यानुसार नियोजन करणे पण तेवढेच आवश्यक आहे. कोरोनाच्या कारणाने काही व्यवसाय क्षेत्रात रोजगारांची मोठी मागणी निर्माण झाली असली तरी ही स्थिती कदाचित वा काही प्रमाणात तात्कालिक वा अल्पकालीन ठरू शकते. यासंदर्भात आरोग्य सेवा व त्यातही तातडीच्या आरोग्य सेवा क्षेत्राचा एक प्रमुख उदाहरण म्हणून उल्लेख करता येईल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणे उमेदवारांच्या हिताचे ठरेल.
कोरोनामुळे व कोरोनानंतर कंपन्यांकडून आपल्या उत्पादन प्रक्रिया वा सेवेचे अधिकाधिक यांत्रिकीकरण करण्यावर भर असेल. यामुळे वाहन उद्योग, प्रक्रिया क्षेत्र यासारख्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी मानवी सहभाग मर्यादित स्वरुपात ठेवण्यावर विशेष प्रयत्न केले जाण्याची शक्मयता आहे. कोरोनाच्या दरम्यान व कोरोनाच्या निमित्ताने कामगारांचे आरोग्य, त्यांची उपलब्धता, विभिन्न शासकीय नियमांचे पालन इ. करतांनाच निर्धारित व मर्यादित कर्मचाऱयांसह कठीण व आव्हानात्मक स्थितीत पण आपले काम आणि व्यवसाय चालू राहण्याच्या दृष्टीने कर्मचाऱयांची निवड नेमणूक करण्यावर यानंतर कंपन्यांचा भर राहणार आहे.
दत्तात्रय आंबुलकर








