मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धा – पृथ्वी शॉ उपकर्णधार
मुंबई / वृत्तसंस्था
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे आगामी सईद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धेसाठी मुंबई संघाचे नेतृत्व सोपवले गेले आहे. युवा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉ उपकर्णधार असेल. मुंबई क्रिकेट संघटनेने सोमवारी आपल्या वेबसाईटवर संघाची घोषणा केली. माजी जलद गोलंदाज सलील अंकोलाच्या नेतृत्वाखालील निवड समितीने संघनिवड केली.
ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट सीईओ व माजी भारतीय हॉकी कर्णधार विरेन रॅस्किन्हा यांनी यावेळी भारताच्या अव्वल ऑलिम्पियन्सच्या आठवणींना उजाळा देत मुंबई क्रिकेट संघाला संबोधित केले. ‘मुंबई रणजी क्रिकेट संघाशी संवाद साधणे आनंददायी होते. निलेश कुलकर्णी, अमोल मुझुमदार, मुंबई क्रिकेट संघटनेचा याबद्दल मी आभारी आहे’, असे ट्वीट रॅस्किन्हा यांनी यावेळी केले.
विरेन यांना यावेळी खेळाडूंची स्वाक्षरी असलेली मुंबई संघाची जर्सी भेटीदाखल प्रदान करण्यात आली. सलील अंकोला, गुलाम पारकर, सुनील मोरे, प्रसाद देसाई व आनंद यल्विगी यांचा समावेश असलेल्या मुंबई निवड समितीने अनुभवी व नवोदित खेळाडूंचा उत्तम मिलाफ साधण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचे यावेळी नमूद केले.
यष्टीरक्षक-फलंदाज आदित्य तरे व मुंबईचा ‘क्रायसिस-मॅन’ सिद्धेश लाड यांचा मुंबई संघात प्राधान्याने समावेश आहे. युवा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वाल, पॉवर-हिटर सर्फराज खान, अष्टपैलू शिवम दुबे यांनाही संघात स्थान लाभले. गोलंदाजीच्या आघाडीवर अनुभवी धवल कुलकर्णीसह तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, डावखुरा मध्यमगती गोलंदाज रॉयस्टन यांचा समावेश आहे. फिरकी गोलंदाजीची धुरा डावखुरा मंदगती गोलंदाज शॅम्स मुलाणीकडे असेल. या स्पर्धेत मुंबईचा संघ आपले सर्व सामने गुवाहाटीत खेळणार आहे.
मुंबई संघ ः अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), आदित्य तरे, शिवम दुबे, तुषार देशपांडे, सर्फराज खान, प्रशांत सोळंकी, शॅम्स मुलाणी, अथर्व अंकोलेकर, धवल कुलकर्णी, हार्दिक टी., मोहित अवस्थी, सिद्धेश लाड, साईराज पाटील, अमन खान, अरमान जाफर, यशस्वी जैस्वाल, तनुष कोटियान, दीपक शेट्टी, रॉयस्टन डायस.