एक अब्ज डॉलरचे कर्ज नाकारले
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
कर्जाची उचल करून कर्ज फेडणाऱया कंगाल पाकिस्तानला आंतराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मोठा झटका दिला आहे. आयएमएफने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास नकार दिला आहे. आयएमएफची मनधरणी करण्यासाठी इम्रान सरकारने वीज आणि पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. आयएमएफकडून कर्ज न मिळाल्याने पंतप्रधान इम्रान खान यांना चीन किंवा आखाती देशांसमोर पुन्हा हात पसरावे लागू शकतात.
आयएमएफने पाकिस्तान सरकारने विनवणी केल्याने अन् अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी 6 अब्ज डॉलर्सची मदत केली होती. याच्या अंतर्गत पुढील हप्त्याच्या स्वरुपात 1 अब्ज डॉलर्स दिले जाणार होते. पण पाकिस्तान सरकार आणि आयएमएफ यांच्यात या रकमेवरूनच्या वाटाघाटी यशस्वी झालेल्या नाहीत. आयएमएफची कर्जासाठी मनधरणी करण्याकरता पाकिस्तानचे अर्थसचिव दीर्घकाळापासून वॉशिंग्टनमध्ये ठाण मांडून आहेत.
पाकिस्तानचे वर्तन पाहता पूर्ण करार रद्द होण्याची शक्यता आहे. आयएमएफच्या अटींची पूर्तता करण्यासाठी इम्रान खान सरकारने काही दिवसांपूर्वी विजेचे दर 1.39 रुपये प्रतियुनिट, पेट्रोलचे दर 10.49 तर डिझेलच्या दरात 12.44 रुपयांची वाढ केली होती. इम्रान यांच्या निर्णयामुळे आयएमएफचे समधान झालेले नाही, पण सर्वसामान्य जनतेवर महागाईचा डोंगर कोसळला आहे.
विदेशी कर्ज न घेण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेले इम्रान खान यांचे सरकार कर्ज फेडण्यासाठी सातत्याने कर्ज घेत आहे. प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर आता 1 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज आहे.









