प्रतिनिधी / सातारा :
हॉटस्पॉट सातारा तालुक्यासह शहरात बाधित वाढ आटोक्यात आल्याने सातारकरांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. सध्या सातारा शहरात 133 सक्रीय रुग्ण असून, यामध्ये 77 होम आयसोलेट, 32 जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात तर 24 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना केअर सेंटरमध्ये कोणीही रुग्ण नसल्याने सेंटर ओस पडली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. एच. पवार यांनी दिली.
दरम्यान, सातारा तालुक्यात ग्रामीण भागात ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 127 एवढी खाली आली आहे. यामध्ये होम आयसोलेट 33, कोरोना सेंटरमध्ये 56, प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 35 रुग्ण उपचार घेत असून सातारा शहर व तालुक्यातील संसर्ग वाढ आटोक्यात येत असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.
आजमितीस सातारा तालुक्यात 4 लाख 42 हजार 101 जणांची तपासणी झाली असून त्यापैकी 3 लाख 96 हजार 679 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तर त्यापैकी बाधितांची एकूण संख्या 51 हजार 494 एवढी आहे. त्यापैकी 49 हजार 962 जणांनी कोरोनावर मात करत लढाई जिंकलीय. यामुळे साताऱ्याचा रिकव्हरी रेट 97.02 टक्के एवढा चांगला आहे. तर एकूण 1 हजार 480 जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात 763, शहरी भागात 509 तर जिल्हय़ाबाहेरील 208 जणांचा समावेश यात आहे.