ग्रा.पं., यात्रा कमिटी व पोलीस प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
वार्ताहर/ कोगनोळी
श्री?क्षेत्र आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी सकाळी आप्पाचीवाडी ग्राम पंचायतीमध्ये आयोजित बैठकीमध्ये हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार हे होते. प्रारंभी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विश्वास आबणे यांनी स्वागत केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव खोत, हालशुगरचे संचालक आर. एम?. खोत यांनीही आपले विचार व्यक्त केले. कोरोना काळामध्ये कोणतीही यात्रा व सामूहिक कार्यक्रम घेण्यासाठी प्रशासनाची परवानगी नाही. त्यामुळे 21 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र पुजारी व मानकऱयांच्या उपस्थितीत फक्त धार्मिक विधी व देवकार्य करण्यात येणार आहे.
यात्रेसाठी भाविकांना प्रवेश नाही. तसेच बाहेरील हॉटेल, दुकाने, पाळणे इत्यादांसाठी परवानगी नाही. याशिवाय यात्राकाळात बाहेरील ग्रामस्थांना परवानगी नाही, असे निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार यांनी सांगितले. तसेच गावामध्ये डांगोरा मारणे, परिपत्रके काढणे, वृत्तपत्रे तसेच समाजमाध्यमातून जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले. बैठकीस ग्राम पंचायतीचे सदस्य, मानकरी, पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्राम पंचायतीचे सचिव संजय खोत यांनी आभार मानले.









