साडेसात लाखाचा चांदीचा ऐवज लंपास
वार्ताहर/ काकती
होनगा येथील श्री कलमेश्वर मंदिरात धाडसी चोरी झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. श्री कलमेश्वर देवाचा मुखवटा, नागफणीची प्रभावळ असा 12 किलोचा साडेसात लाखाचा चांदीचा ऐवज घेऊन चोरटय़ांनी पलायन केले आहे.
देवस्थानचे पुजारी व हक्कदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सीमोल्लंघनाचा धार्मिक विधी झाल्यानंतर श्री भैरवनाथ मंदिर प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेली पालखी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मंदिरात ठेवण्यात आली. दोन्ही मंदिरे लागून आहेत. शुक्रवारी रात्री कलमेश्वर मंदिराला कुलूप लावून देवस्थानचे पुजारी व हक्कदार रात्री तीन वाजण्याच्या सुमारास श्री भैरवनाथ मंदिरात झोपी गेले होते.
शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी व हक्कदार मंदिराच्या दरवाजाचे कुलूप काढण्यासाठी गेले असता मंदिराच्या दरवाजाची कोंडी तोडून श्री देवाचा चांदीचा मुखवटा, नागफणीची प्रभावळ चोरटय़ांनी पळविल्याचे उघडकीस आले. काकती पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास चालविला आहे.









