भाविकाचा घेतला जीव – हिंदूधर्मीयांचे पंतप्रधान मोदींना मदतीचे आवाहन
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या अनेक दाव्यांनंतरही देशात हिंदू मंदिरांवरील हल्ले वाढतच चालले आहे. दुर्गा मंदिरांमध्ये तोडफोड झाल्याच्या काही तासांनी नोआखाली भागात सुमारे 200 धर्मांधांनी इस्कॉन मंदिरांवर हल्ला केला आहे. कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात इस्कॉनचे सदस्य पार्थ दास यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
इस्कॉनने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदूंच्या सुरक्षेसाठी मदत करण्याचे आवाहन केले तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. हा हल्ला शुक्रवारी करण्यात आला आहे. पार्थ दासच्या शरीरातील अनेक भाग धर्मांधांकडून वेगळे करण्यात आले होते असे इस्कॉनच्या एका सदस्याकडून सांगण्यात आले आहे.

या हल्ल्यात मंदिराचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हल्लेखोरांनी मंदिरासमोरील दुर्गापूजा मंडपही उद्ध्वस्त केला आहे. तर गुरुवारीच बांगलादेशातील अनेक दुर्गा पूजा मंडपांवर हल्ला करून तोडफोड करण्यात आली होती. कोमिला शहरात नानुआर दिघी सरोवरानजीक एका दुर्गा पूजा मंडपात धर्मग्रंथाचा अवमान करण्यात आल्याची अफवा पसरविण्यात आली होती. त्यानंतर धर्मांधांनी चांदपूरच्या हाजीगंज, चट्टोग्रामच्या बंशखली आणि कॉक्सबाजारच्या पेकुआमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले केले होते.
गुन्हेगारांवर कठोर कारवाई
कट्टरवाद्यांच्या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पंतप्रधान शेख हसीना यांच्या निर्देशानुसार 22 जिल्हय़ांमध्ये निमलष्करी दलांना तैनात करण्यात आले आहे. शेख हसीना यांना देशात सांप्रदायिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱयांना कठोर इशारा दिला आहे. कोमिलामध्ये हिंसाचाराच्या गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारताला सूचना
भारताने समाजकंटकांबद्दल कठोर भूमिका घ्यावी. बांगलादेशात प्रभाव पडेल आणि आमच्या हिंदूंना अडचणींना तोंड द्यावे लागेल असे भारतात काही घडू देऊ नये. भारतात काही घडल्यास आमच्या देशातील हिंदू प्रभावित होतात. भारतालाही सतर्क रहावे लागणार असल्याचे हसीना यांना म्हटले आहे.









