ओनलाईन टीम/तरुण भारत
१५ ऑगस्ट रोजी तालिबानींनी काबूल विमानतळावर ताबा मिळवला आणि संपूर्ण अफगाणिस्तानवर अंमल प्रस्थापित झाल्याचं जाहीर केलं. आता अफगाणिस्तानमधलं नवीन सरकार जागतिक स्तरावर स्वीकृती मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. सध्याच्या तालिबान सरकारमधील अनेक व्यक्ती या जागतिक स्तरावर दहशतवादी म्हणून काळ्या यादीत आहेत. त्यामुळे या सरकारला जागतिक स्वीकृती मिळावी यासाठी अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांकडून अनेक अटी घातल्या जात आहेत. अफगाणिस्तानवर घालण्यात आलेले निर्बंध तातडीने हटवावेत, यासाठी तालिबानी प्रयत्न करताना दिसत आहेत.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आहे. मात्र, अजूनही तालिबानच्या अधिपत्याखाली असलेल्या अफगाणिस्तान सरकारला जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली नाही. तालिबान तेथील नागरिकांना देत असलेला त्रास संपूर्ण जगणे पहिला आहे. त्यामुळे नवीन तालिबान सरकारला जागतिक स्वीकृती मिळणे अवघड वाटत आहे. तर या पार्श्वभूमीवर तालिबानी सरकारच्या शिष्टमंडळाने पहिल्यांदाच अमेरिकन सरकारशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर त्यावर संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी स्पष्ट भूमिका मांडत, अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर भाष्य करताना गुटेरस यांनी तालिबान्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. तसेच, इतर देशांनी अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी हातभार लावणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी नमदू केलं आहे.
अँटोनियो गुटेरस यांनी सोमवारी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये अफगाणिस्तानमधील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. विशेषत: अमेरिकेसोबत तालिबानी सरकारच्या शिष्टमंडळाच्या पहिल्या भेटीमध्ये अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर या मुद्द्यावर गुटेरस यांनी तालिबानला स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. “मला अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींची जास्त चिंता वाटते आहे. तालिबानींनी या दोन्ही गटांना दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. त्यांनी दिलेलं वचन मोडलं आहे”, असं गुटेरस म्हणाले आहेत.