दूध उत्पादकांना फटका, चांगल्या प्रतीच्या बि-बियाण्यांपासून वंचित
प्रतिनिधी /बेळगाव
पशुसंगोपन खात्यामार्फत दूध उत्पादक शेतकऱयांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. खात्यामार्फत दूध उत्पादक शेतकऱयांच्या जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध व्हावा, शिवाय उत्तम प्रतीचे बि-बियाणे उपलब्ध करून दिली जात होती. मात्र कोरोनामुळे मागील वर्षापासून बि-बियाणे वितरणाला बेक लागला आहे.
ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱयांच्या जनावरांना चांगल्या प्रतीचे वैरण मिळावे, याकरिता उत्तम दर्जाचा 6 किलो मका व 5 किलो ज्वारी मोफत दिली जात होती. त्यामुळे जनावरांना चांगल्या प्रतीचा आहार मिळायचा. मात्र मागील दोन वर्षापासून बि-बियाणे वितरण थांबले आहे. रब्बी हंगाम तोंडावर आल्याने आता बि-बियाणे उपलब्ध करून द्या, अशी मागणी होत आहे.
तालुक्मयात असलेल्या हिरेबागेवाडी, सांबरा, उचगाव, अनगोळ, के. के. कोप्प, हुदली, कडोली, संतीबस्तवाड, येळळूर, आंबेवाडी, काकती, सुळेभावी, महांतेशनगर, वडगाव, गजपती, हलगा, निलजी, नंदीहळळी, किणये आदी पशुवैद्यकीय दवाखान्यांतून बि-बियाणे दूध उत्पादकांना दिली जात होती.
दुष्काळी परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱयांना चाऱयाची कमतरता भासू नये, याकरिता खात्यामार्फत खबरदारी म्हणून खरीप व रब्बी हंगामाच्या तोंडावर बि-बियाण्यांचे वाटप केले जाते. त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध होण्याबरोबर दूध उत्पादकांची आर्थिक बाजू मजबूत व्हायला वाव मिळतो. मात्र मागील वर्षापासून बि-बियाणे वितरणात खंड पडल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत. यंदा जुलै महिन्यात पावसाने हाहाकार माजविल्याने नदीकाठच्या हजारो एकर क्षेत्रातील शेती पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे भविष्यात चाऱयाचा दुष्काळ निर्माण होऊ नये, याकरिता पशुसंगोपन खात्याने तातडीने चांगल्या प्रतीच्या बि-बियाण्यांचे वाटप करावे, अशी मागणी होत आहे.









