-कोट्यावधीची उलाढाल ठप्प, -शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद
प्रतिनिधी/कोल्हापूर
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि दिवंगत शेतकऱयांना आदरांजली वाहण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने सोमवारी पुकारलेल्या बंदला कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, उद्योजक, व्यवसायिकांसह नागरीकांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून आवाहनास प्रतिसाद दिला. बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस, व राष्ट्रवादीच्यावतीने कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने केली. शहरातील प्रमुख बाजारपेठांमधून मोटरसायकल रॅली काढून बंदचे आवाहन केले. तर शिवसेनेच्यावतीने तावडे हॉटेल नजीक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून केंद्र सरकारचा निषेध केला.
महाविकास आघाडीने केलेल्या बंदच्या आवाहनानुसार सर्व व्यवसाय व व्यापारपेठ बंद राहील्याने शहरात शुकशुकाट दिसत होता. भाजी मंडई मात्र सुरू होती. राजारामपुरी, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, महाव्दार रोड, लक्ष्मी रोड आदी प्रमुख बाजारपेठेसह शिवाजी मार्केट, कपिलतिर्थ मार्केट ही बंद होते. त्यामुळे शहरात सर्वत्र `शटर डाऊन’ असे चित्र पहावयास मिळाले. तर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात येणाऱया भाविकांची गर्दी मात्र कायम होती. बंदमुळे कोटÎवधी रूपयांची उलाढाल ठप्प झाली.
राजारामपुरीत शटर डाऊन
शहरातील दुसरा महाव्दार रोड म्हणून ओळख असलेल्या राजारामपुरी मेन रोडवरील अत्यावश्यक सेवा असलेली औषध दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. एका व्यापारी संघटनने राजारामपुरीमधील दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण व्यापाऱयांनी मात्र आपली दुकाने बंद ठेवणे पसंत केले. काहीनी पुढील शटर बंद करून मागील दरवाजाने व्यवसाय सुरू ठेवला होता. सणामुळे शहरातील कापड दुकाने सुरू ठेवणार असल्याचे रेडीमेड असोसिएशनने जाहीर केले होते. तरीही व्यापाऱयांनी दुकाने बंद ठेवली होती.
लक्ष्मीपुरी धान्यबाजार, लक्ष्मी रोड व गुजरीत शुकशुकाट
राज्यव्यापी बंदला धान्य व्यापाऱयांनी उत्स्फुर्त पाठीबा देऊन, आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. यामुळे धान्यांच्या वाहनाबरोबरच ग्राहक नसल्याने लक्ष्मीपुरीमध्ये शुकशुकाट दिसत होता. तसेच कोरोना कमी झाल्याने, दसरा, दिवाळी व लग्नसराईसाठी कपडे, जथ्था काढण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. पण बंदमुळे लक्ष्मी रोडवरील कापड दुकाने बंद होती. शहरात सर्वात जास्त आर्थिक उलाढाल करणाऱया सराफ व्यावसायिकांची काही दुकाने अर्ध शटर उघडून सुरू होती. पण ग्राहकच नसल्याने, फक्त दुकाने उघडलेली दिसत होती.
महाव्दार रोडवर फेरीवाल्यांच्या गाडया सुरू
महाराष्ट्र बंदमुळे महाव्दार रोडवरील दुकाने बंद असली तरी, रोडवरील फेरीवाल्यांच्या गाडया सुरू होत्या. तेथे कपडे, स्टेशनरी, फुले खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी होती. रेडीमेड असोशिएशनने दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रत्यक्षात कापड दुकाने बंद असल्याने, फेरीवाल्यांकडेच लोकांची खरेदी सुरू होती. तर पापाची तिकटी रोड, महापालिका परिसरातील सर्व दुकाने बंद होती.