अस्मिता मोहिते / सातारा :
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हाच ध्यास व ध्येय डोळय़ासमोर ठेऊन आपली सेवा बजाविणाऱ्या एकमेव शिक्षिका म्हणजे विद्या गाढवे. त्यांची शिक्षणाप्रतीची निष्ठा पाहून त्यांना नुकताच ‘जिल्हा आदर्श शिक्षका’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. घाटेवाडीसारख्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा त्यांचा प्रवास अविरतपणे सुरूच आहे.
विद्या या मुळच्या येरवळे, कराड येथील एकत्र कुटुंब पध्दतीत वाढलेल्या. त्यांचे वडील जगन्नाथ दिनकर यादव यांनी रयत शिक्षण संस्थेच्या डी. एड. कॉलेज कुसुर (ता. कराड) येथे प्राध्यापक म्हणून सेवा बजाविली आहे. तर आई विमल यादव या गृहिणी होत. यादव कुटुंबात शिक्षणाला अति महत्व देण्यात येत असल्याने त्यांची इतर भावंड ही उच्च विद्याविभुषित झाली आहेत. त्यामध्ये त्यांची बहिण मेघा दिनकर यादव या उंब्रज येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर लहान बहिण आर्चना या एमपीएससीचे शिक्षण घेत आहेत. भाऊ गणेश यांनी एम.बीए. नंतर डॉक्टरेट केली आहे. विद्या यांनाही वैद्यकीय क्षेत्राकडे जाण्याची इच्छा होती, पण एकत्र कुटुंब आणि इतर भावडांची शिक्षण असल्याने ते शक्य झाले नाही. त्यातच महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी बी.एस्सीची पदवी संपादित केली. आणि शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्या.
विवाहानंतर त्या खंडाळा येथे आल्या, त्यांचे पती शशिकात रामचंद्र गाढवे हे सोनवडी गजवडी हायस्कुल येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सासरकडील अनेक मंडळी ही शिक्षण क्षेत्राशीच संलग्न आहेत. त्यांना मुले दोन असुन मोठा मुलगा इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे, तर लहान मुलगा इयत्ता 9 वी मध्ये आहे.कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत 21 वर्षे विद्या या शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत. सन् 2018 साली त्यांनी बदली घाटेवाडीसारख्या अतिदुर्गम भागात झाली. विद्यार्थ्यांसह पालकांना स्वच्छतेचे महत्व पटवले. लॉकडाऊनमध्येही गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. शाळेत ज्ञानरचनावादी शैक्षणिक प्रयोगशाळा उभी केली आहे. घाटेवाडी येथील डोंगरावर 100 हुन अधिक झाडे लावली.

ज्ञानरचनावादासाठी अविरत कष्ट
‘ज्ञानरचनावाद पध्दत’ शिक्षण या माध्यमातुन विद्या यांचे विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी 2004 पासुन कार्य सुरू आहे. 2012 ते 2018 त्यांची बदली मानेवाडी कारी येथे झाली. या काळात ‘ज्ञानरचनावाद पध्दती’ कार्य करताना प्रत्येक विद्यार्थी 100 टक्के शिकला पाहिजे त्यांच्या सर्व क्षमता विकसित झाल्या पाहिजे, हा या मागचा मुख्य हेतू होता. शालेय शिक्षणमंत्री सचिव नंदकुमार साहेब यांनी भेट दिली असता यावेळी कुमठे बिट येथे प्रतिभा भराडे यांनी सुरू केलेल्या ज्ञानरचनावाद पध्दतीच्या कार्याविषयी ते प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी विविध शाळेतील शिक्षकांना या शाळेस भेटी देण्यास सांगितले. तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या जीआर अनेक शिक्षकांनी शाळेस भेटी दिल्या. भापकर साहेब व मुख्यमंत्री यांच्या स्वीय सहाय्यक प्राची साठे यांनी ही मानेवाडी शाळेस भेट दिली. उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे मानेवाडी शाळेस भेट दिली व शाळेस देणगी दिली. त्यांनी सेंद्रीय शेती आणि गांडुळ खत हा प्रयोगशाळेत राबविला.
राज्यातील शिक्षकांना रचनावाद अंतर्गत प्रशिक्षण
प्रतिभा भराडे मॅडम यांच्यासोबत राज्यभर रचनावाद कसा राबवावा यासाठीचे प्रशिक्षण दिली. तसेच चंद्रपुरसारख्या भागात पुरूष शिक्षकांनी प्रशिक्षणाकरीता नकार दिल्यास सौ. विद्या व यांच्यासमवेत इंदिरा गायकवाड यांनी जाऊन तेथील शिक्षकांना रचनावाद अंतर्गत प्रशिक्षण दिले. तसेच रत्नागिरी, औरंगाबाद, शेवगाव, यवतमाळसह संपुर्ण सातारा जिल्हय़ातील अनेक शिक्षकांना प्रशिक्षण दिले. रचनावादी पध्दतीने शिक्षण कसे द्यायचे याचे प्रशिक्षण लॉकडाऊन काळात ही सुरूच आहे.
‘शाळा बंद शिक्षण सुरु’ उपक्रमात लिखाण
2016 साली ‘शिक्षणाची वारी’ या महाराष्ट्राच्या शैक्षणिक स्टॉलचे प्रतिनिधीत्व त्यांनी पुणे येथे केले. 2017 मध्ये मी मुख्यमंत्री बोलतोय यामध्ये ही लोहार सरांसमवेत विद्यार्थी आणि त्यांचा सहभाग होता. राज्यस्तरावर एससीईआरटी पुस्तक निर्मिती व शैक्षणिक साहित्य निर्मितीत सहभाग. त्याचबरोबर ‘तरुण भारतने लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या ‘शाळाबंद शिक्षण सुरू’ या उपक्रमात प्रभावशाली लिखाण केले होते. तसेच साई सेवा फौंडेशन पंढरपूरचा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार 2021 चा आदर्श शिक्षक पुरस्कार, नंदूरबार येथील निवासी शिक्षकांसाठी प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांना येथील जिल्हाधिकारी कलहट्टी यांच्या हस्ते सन्मानित केले.









