प्रा. वासंती जोशी : ‘कन्याकुमारी ते लेह’ सायकल प्रवासाच्या आठवणींना उजाळा
प्रतिनिधी /बेळगाव
‘कन्याकुमारी ते लेह’ हा सायकल प्रवास सोपा नव्हता, पण अशक्मयही नव्हता. मन आणि भावनांवर नियंत्रण ठेवून वातावरणाशी जुळवून घेत केलेला हा सायकल प्रवास समृद्ध करणारा ठरला. माणसांच्या चांगुलपणावर विश्वास हवा, याचे पुनःप्रत्यंतर दिले, असे प्रतिपादन प्रा. वासंती जोशी यांनी केले.
लोकमान्य रंगमंदिर येथे सुरू असलेल्या शारदोत्सव सोहळय़ात रविवारी ‘दोन चाकावरून के टू एल’ प्रवासाचा अनुभव कथन त्यांनी केला. त्या म्हणाल्या, 35 दिवसात आपण 4 हजार 120 कि.मी. अंतर सायकलवरून पार केले. कन्याकुमारी, मदुराई, बेंगळूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, मधार, चितोडगड, जयपूर, मनाली ते लेह या प्रवासात अनेक अनुभव आले.
प्रवासाला जाताना तेथील तापमान आणि ऋतू यांचे वेळापत्रक जमवून घेणे आवश्यक आहे. आपल्यासमवेत गायत्री फडणीस, केतकी जोशी, गिरीकंदच्या शुभदा जोशी या पाठिंबा देण्यासाठी चार चाकी वाहनातून सोबत करत होत्या. लेहमधील अत्यंत खडतर असलेल्या उमलिंग-ला येथे जाणारी मी पहिली महिला ठरले. यासाठी आपण पंतप्रधान ते लष्करी दल यांच्याशी सतत संपर्क केला. मी जेव्हा प्रवास सुरू केला, तेव्हा मला या ठिकाणी जाण्यास तत्वतः परवानगी मिळाली आणि माझे स्वप्न पूर्ण झाले, असे त्यांनी सांगितले.
कन्याकुमारी ते महाराष्ट्रामध्ये एक वेगळे वातावरण दिसते. पण जेव्हा आपण जयपूरपर्यंत जातो तेव्हा मात्र त्या राज्यांचे वेगळेपण लक्षात येते. अनेक ठिकाणी ट्रकचालक पूर्वी ओव्हरटेक करत असत. परंतु, आता त्यांची मानसिकता बदलली आहे आणि तेही आपल्याला सहकार्य करतात, हा अनुभव त्यांनी कथन केला. मनालीमध्ये एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या खेमराज यांच्याकडून आपण माहिती घेतली. मनालीच्या पुढचा प्रवास कठीण होता. मनाली ते लेह हा 500 किलोमीटरचा प्रवास करताना सतत बदलणारे तापमान, बोचरा वारा आणि विरळ होत असलेले वातावरण यांच्याशी जुळवून घेत सायकल चालविणे ही सत्वपरीक्षा होती. परंतु, त्यात आपण यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालो, याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
प्रवासादरम्यान शुभदा यांचे पती विश्वास यांनी ठरावीक अंतरानंतर चालक पाठवला होता. एकवेळ अशी आली की, दोन्ही सहप्रवासी मुलींना त्यांच्यासोबत मला पाठवावे लागले. पण मला मुळीच भीती वाटली नाही. कारण माणसांच्या चांगुलपणावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासापोटीच आपण हा प्रवास पूर्ण करू शकलो, असेही जोशी यांनी सांगितले.
प्रेंड्स सर्कलतर्फे स्वागतगीत व ईशस्तवन सादर झाले. समीना यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. व्याख्यानानंतर डॉ. संध्या देशपांडे दिग्दर्शित कविवर्य वसंत बापट यांच्या साहित्यावर आधारित ‘रंगवसंत’ हा कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन रोहिणी गणपुले यांनी केले. शुभांगी फाटक यांनी आभार मानले.
अनिश्चिततेने घेरलेला प्रवास…
मनालीजवळ येताच आपल्याला डोंगर आणि पर्वतरांगांचे दर्शन घडते. जेथे डेंगर संपतात तेथे पर्वतरांगा सुरू होतात. या सर्व ठिकाणी कधी बर्फ पडेल, रस्ता बंद होईल, कधी एखादी दरड कोसळेल याचा काही नेम नसतो. संपूर्ण अनिश्चितता आपल्याला नेहमीच घेरून असते. अशा वेळी फक्त मन आणि भावनांचे नियंत्रण याच्या जोरावरच आपण वाटचाल करू शकतो आणि अशा ठिकाणी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन रस्ता बांधणी करते, हे खूप कौतुकास्पद आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.









