म्हसवड परिसरात मुसळधार पाऊस, रस्ते व शेती झाली जलमय
प्रतिनिधी/ म्हसवड
शनिवार आणि रविवारी म्हसवड शहर व परिसरात परतीच्या ढगाचा गडगडाटात पावसाने जोरदार बॅटीग केल्याने म्हसवडचे रस्ते अक्षरशः पावसातच हरवून गेले आहेत. सर्व रस्ते जलमय झाले असून नागरिक त्यातुन रस्ता शोधत आहेत. माणगंगा दुथडी वाहू लागली आहे तर परिसरातील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. शहरात धडाकेबाज पाऊस पडत असल्याने शहरातील विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. देवापुर परिसरातही उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात झोपल्याने नुकसान या पावसाने झाले आहे.
म्हसवड शहरातील रस्त्यावरील सखल भागात पावसाचे मोठय़ा प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र असून नव्याने केलेले सिमेंट कॉँक्रिट रस्ते उखडले आहेत. यंदा माण तालुक्यावर वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी केली असून उशिरा का होईना पण याठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने माणगंगा नदी दुथडी वाहत आहे माणगंगा नदीवरील बंधारे भरभरुन वाहु लागले आहेत.








