गौरी आवळे / सातारा :
संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, ज्यांच्यात लढण्याची खरी ताकद असते. हीच ताकद बनून महिलांसाठी सामाजिक ते राजकीय क्षेत्रात सुवर्णा नरेंद्र पाटील यांनी सक्षमीकरणाचा लढा उभारला आहे. त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले आहे. महिला सक्षम झाली तरच संपूर्ण कुटुंब सक्षम होणार आहे. असा विश्वास त्यांनी महिलांमध्ये निर्माण केला आहे.
माहेरी मिळालेला सामाजिक आणि राजकीय वारसा सोबत घेवून सुवर्णा पाटील यांनी ही वाटचाल सासरी सुरू ठेवली. सासरची जबाबदारी पार पाडत त्यांनी समाजाची ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. 2011 साली त्यांनी ज्योतिर्मय फौंडेशनची स्थापना केली. या फौंडेशनच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या. महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. तसेच त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली. दरवर्षी त्या ज्योतिर्मय महोत्सवाचे आयोजन करतात. या महोत्सवातील नवनवीन वस्तू ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. या महोत्सवात सातारा शहरासह जिह्यातून ग्राहक खरेदीसाठी येतात. फौंडेशनच्या वतीने महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालयात सॅनिटायझर मशीन बसवल्या. मातोश्री वृद्धाश्रात साहित्यांचे वाटप, निरीक्षण गृहात खेळणी वाटप, कोरोना काळात धान्याचे किट वाटप केले. सामाजिक कार्यासोबत त्यांनी राजकीय वाटचाल ही सुरू ठेवली.
2010 साली त्यांनी भारतीय जनता पक्षात जिल्हाध्यक्ष, 2014 साली शहर अध्यक्ष, विशेष निमंत्रित सदस्य, जिल्हा कोर कमिटीत सदस्य अशा पदावर यशस्वीपणे कामकाज केले. मराठा मोर्चातही त्यांनी सहभाग घेतला. 2011 साली नगरसेवक म्हणून त्यांनी सातारा नगरपालिकेत आपल्या कामाचा ठसा उमटविला. 2016 साली साताऱयाच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. भाजपच्या कोल्हापूर प्रभारी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदावर त्या कार्यरत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यावर त्या नेहमी भर देतात.
स्वत:ची ओळख घडवा…
महिलांनी आता स्वत:च सक्षमीकरणासाठी खंबीरपणे लढा उभारला पाहिजे. तरच येणाऱ्या तरुणी, महिलांच्या विकासात आणखी भर पडणार आहे. महिला नेहमी दुसऱ्याचा विचार करतात. तसा स्वत:ची झाला पाहिजे. जी संधी मिळेल. त्या संधीचे सोने झाले पाहिजे. त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर त्यांनी आपली ओळख घडवण्यासाठी केला पाहिजे.
-सुवर्णाताई नरेंद्र पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा, भाजप