गौरी आवळे / सातारा :
कोणते क्षेत्र महिलांसाठी बनलेले नसते. तर प्रत्येक क्षेत्रात महिला काम करू शकतात. हा एकच ध्यास समोर ठेवून परिवहन महामंडळात सातारा आगाराच्या डेपो मॅनेजर रेश्मा पवार-गाडेकर या कणखरपणे आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. बीए, एलएलबी चे शिक्षण पूर्ण करत रेश्मा पवार-गाडेकर यांनी जॉब करण्यास सुरूवात केली. वडील शंकर गाडेकर यांचा व्यवसाय होता. त्यांच्या आईला सामाजिक कार्याची आवड होती. दोन भाऊ, बहिण उच्च शिक्षित आहेत. चांगल्या पदावर काम करत आहेत. यामुळे आपण ही चांगली नोकरी मिळवायची हा एकाच ध्यास त्यांनी ठेवला.
या विचाराला प्राधान्य देत त्यांनी परिवहन महामंडळात नोकरी मिळवली. त्यांचे माहेर आणि सासर साताराच आहे. वेगळया क्षेत्रात आपला ठसा उमटला पहिजे. म्हणून त्यांनी परिवहन महामंडळात नोकरी मिळवली. त्याची सुरूवात सातारा डेपोतून झाली. सातारा एसटी डेपोत त्या कंडक्टर पदावर रूजु झाल्या. काम करताना याच पदावर न राहता, पुढे वाटचाल करत त्यांची प्रयत्नांच्या जोरावर 2011 साली वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक पदी पदोन्नती झाली. 2016 ला पुन्हा त्याची पदोन्नती सहाय्यक अधिक्षक पदी झाली. रायगड येथे त्यांची बदल झाली. तिथे अलिबाग, श्रीवर्धन असे दोन डेपोची जबाबदारी त्यांना देण्यात आली. तोच 2019 मध्ये त्यांची बदली सातारा डेपोत झाली. सुरूवातीला त्यांना दहिवडी डेपो नंतर सातारा डेपो देण्यात आला. डेपोत काम करताना त्या सर्व कर्मचाऱयांना सोबत घेवून काम करतात. सर्व कर्मचारीही सहकार्य करत असतात. गतवर्षी दाखल झालेल्या कोरोनात एसटी बसची सेवा बंद ठेवण्यात आली होती. यामुळे परिवहन महामंडळाला मोठे नुकसान झाले होते. तरीही त्यांनी यांची परवा न करता आपल्या कामाशी एका निष्ठ होवून जबाबदारी पार पाडली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्याने ती सुरू झाली. यावेळी प्रवाशांना कोरोनाची लागण होवू नये म्हणून त्यांनी स्वत: खबरदारी घेतली. सर्व एसटीबसवर सँनिटायझर ची फवारणी केली आहे का, प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवा, मास्क लावा अशा सुचना देत होत्या. तसेच प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून प्रवाशांची संख्येनुसार एसटीच्या फेऱ्या सुरू ठेवल्या होत्या.
प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमी पुढाकार घेत असतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना वेळेत एसटीबसची सेवा मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. काम आणि घर अशी दुहेरी जबाबदारी पार पडताना त्यांच्या पतीची मोठा साथ त्यांना मिळते. त्यांच्या कामाचा भार कमी होतो. यामुळे प्रत्येक संकटावर त्या सहज मात करतात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात आणखी मोठय़ा पदावर काम करण्याची त्यांची इच्छा आहे. तसे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
चॅलेजिंग काम करण्याची आवड
सातारा डेपो हा माझा होम डेपो आहे. मला फिल्डवर जावून काम करण्याची आवड आहे. यामुळे मी परिवहन महामंडळात नोकरी मिळवली. काही वर्षापूर्वी या क्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी होते. तरीही मी न घाबरता, न डगमगता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर काम करत गेले. आता महिलांचे प्रमाण वाढत आहे. मॅकेनिक ते विभागीय नियंत्रक अशा मोठा पदावर महिला पोहचल्या आहेत. ही आनंदाची बाब आहे. कोणत्याही क्षेत्रात महिलांनी काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. कुणाच्या सहकार्याची अपेक्षा न ठेवता कामाचा अनुभव घेतला पाहिजे. तरच तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. चुका झाल्या तरी त्यातून शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. आज सर्व सोयी-सुविधा सहज उपलब्ध होत आहेत. आता महिलांना सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतली पाहिजे.
– रेश्मा पवार-गाडेकर,
आगार व्यवस्थापक, सातारा आगार