घटस्थापना विधी संपन्न : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी यल्लम्मा देवीचे घेतले दर्शन : कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वार्ताहर / बैलहोंगल
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा रेणुकादेवीचे गुरुवारी घटस्थापनेदिवशी नवरात्रोत्सवातील पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी तेल अर्पण करून दर्शन घेतले.
‘उदो ग आई उदो’च्या गजरात यल्लम्मा डोंगर परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता. गुरुवारी सायंकाळी देवस्थानात विधानसभेचे उपसभापती व आमदार आनंद मामनी, बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी रवि कोटारगस्ती व पुजाऱयांच्या हस्ते घटस्थापना पूजाविधी समारंभ पार पडला.
गाभाऱयासमोर प्रथमच तेल अर्पण करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आठ दिव्यांभोवती भाविकांची गर्दी दिसून आली. दर्शनासाठी बेळगाव जिल्हय़ातील व परराज्यांतील विविध ठिकठिकाणांहून भाविकांनी बस-खासगी वाहनांतून हजेरी लावल्याने डोंगर फुलून गेला होता. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगुळभावी पुंडात भाविकांनी स्नानासाठी एकच गर्दी केली होती.
गुरुवारी दुपारी दर्शनासाठी गर्दी वाढली होती. कडक उन्हाची व सायंकाळच्या सुमारास कोसळणाऱया पावसाची तमा न बाळगता भाविकांची अलोट गर्दी झाली
होती.
मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी रवि कोटारगस्ती यांनी भाविकांना सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून 40 बसची सोय, वीज, पाणी व स्वच्छता आदी सुविधा पुरविल्या जात असल्याचे सांगून भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करून दर्शन घेण्याचे आवाहन केले आहे.









