प्रतिनिधी /बेळगाव
शहरात एकीकडे पाणीटंचाई भासत आहे, तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहापूर भागात बुधवारी दिवसभर नळाद्वारे पाणी वाया गेले. पाणीपुरवठा नियोजन करणाऱया कंपनीच्या अधिकाऱयांमुळे शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची टीका नागरिक करीत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठय़ाचे नियोजन व्यवस्थित करून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
शहरातील काही भागात दोन दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. तर दुसरीकडे गळतीवाटे आणि नळाद्वारे पाणी वाया जात आहे. अनगोळ भागात दोन दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. तर बुधवारी शहापूर परिसरात संपूर्ण दिवसभर पाणी पुरवठा सुरू होता. परिणामी काही ठिकाणी नळांना चाव्या नसल्याने पाणी वाया गेले. शहापूर परिसरात सकाळी आठ वाजता पाणीपुरवठा करण्यात आला होता. पण पाणीपुरवठा बंद करण्यात आला नाही.
काही ठिकाणी गळतीद्वारे पाणी वाया जात आहे. पाणीपुरवठा नियोजनाचा कारभार पूर्णतः कोलमडला असून याचा फटका नागरिकांना बसत आहे. एल ऍण्ड टी कंपनीकडे पाणीपुरवठा नियोजनाचा कारभार सोपविण्यात आला आहे. पण मागील तीन महिन्यांपासून पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होत आहे. तसेच काही ठिकाणी नादुरुस्त असलेल्या कुपनलिकांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.









