शिवबसवनगर येथील व्यापारी संकुलाच्या आवारात महापालिकेकडून लिलाव प्रक्रिया
प्रतिनिधी /बेळगाव
शिवबसवनगर येथील केपीटीसीएल कार्यालयाशेजारील रस्त्यापेक्षा गाळय़ांचे महत्त्व वाढले आहे. मागीलवेळी आयोजित केलेल्या बोलीवेळी सर्वाधिक 33 हजार रुपये बोली लावण्यात आली होती. मात्र अनामत रक्कम भरणा केली नसल्याच्या कारणास्तव लिलाव रद्द करून आता नव्याने लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट बसथांब्यांवर उभारण्यात आलेले दहा गाळे भाडेकराराने देण्यासाठी लिलाव होणार आहे. गुरुवार दि. 7 रोजी सकाळी 11 वा. लिलाव प्रक्रियेस शिवबसवनगर येथे प्रारंभ होणार आहे.
स्मार्ट रोड बनविण्याबरोबरच महसूल उत्पन्नासाठी व्यापारी गाळय़ांची निर्मिती करण्यात आली आहे. या परिसरात 14 गाळय़ांची उभारणी करण्यात आली आहे. सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिका प्रशासनाने लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. या परिसरात शाळा, महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालय तसेच केपीटीसीएल कार्यालय असल्याने नेहमी गर्दी असते. हा परिसर गजबजलेला असल्याने गाळय़ांसाठी मोठय़ा प्रमाणात मागणी होती. त्यामुळे गाळय़ांच्या बोलीवेळी प्रतिमहिना 33 हजार रुपयेपर्यंत गेली होती. पण अनामत रक्कम वेळेत भरली नसल्याने लिलाव रद्द करून आता पुन्हा नव्याने लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत
आहे.
सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्याकरिता महापालिका प्रशासनाने 2 लाख रुपये अनामत रक्कम आणि प्रतिमहिना 12 हजार रुपये किमान भाडे निश्चित केले आहे. तसेच 14 पैकी एका गाळेधारकाने अनामत रक्कम भरली होती. यामुळे आता 13 गाळय़ांसाठी लिलाव होणार आहे. सदर लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी 2 लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागणार
आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले 10 गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. याकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर लिलाव शिवबसवनगर येथील व्यापारी संकुलाच्या आवारात होणार आहे. 10 पैकी 2 गाळे मागासवर्गियांसाठी आणि 1 गाळा अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. गाळा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी 30 हजार रुपये अनामत रक्कम भरणे बंधनकारक असून 3 हजार रुपये प्रतिमाह भाडे निश्चित करण्यात आले आहे. 3 हजार रुपयाहून पुढे बोली लागणार आहे.
आरपीडी क्रॉस, अशोक चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाशेजारी, केएलई रुग्णालयाजवळ, गोगटे चौक, गोवावेस बसवेश्वर चौक, राणी चन्नमा चौक, धर्मवीर संभाजी चौक, दुसरे रेल्वेगेट अशा ठिकाणी असलेल्या दहा गाळय़ांचा लिलाव आज होणार आहे.
गाळे-ई टॉयलेटवरील धूळ हटली

शहरातील विविध गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने लिलाव आयोजित केला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्मार्ट बसथांब्यांवर उभारण्यात आलेले गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी गुरुवार दि. 7 रोजी बोली लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गाळय़ांची स्वच्छता करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून साचलेली धूळ अखेर लिलावाच्या पार्श्वभूमीवर हटली आहे. शहरात स्मार्ट बसथांब्यांवर 10 ठिकाणी गाळे उभारण्यात आले आहेत. सदर गाळय़ांमध्ये कॅफेटोरिया सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव आहे. सदर बसथांब्यांची उभारणी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आली होती. या ठिकाणी उभारण्यात आलेले गाळे महापालिकेकडे हस्तांतर केले आहेत. यापूर्वी या गाळय़ांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव होता. पण हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने लिलाव झाला नव्हता. मात्र महापालिकेने शहरातील विविध व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी गुरुवार दि. 7 पासून लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे. याअंतर्गत स्मार्ट बसथांब्यांवरील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत.
गाळय़ांची उभारणी करण्यात आल्यापासून स्वच्छता करण्यात आली नव्हती. गाळय़ांचा वापर बेवारस नागरिकांनी चालविला होता. तसेच स्मार्ट बसथांब्यांशेजारी असलेल्या ई-टॉयलेटचा वापर सुरू नव्हता. त्यामुळे ई-टॉयलेटची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे महापालिकेने लिलावाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे काम हाती घेतले असून गाळे आणि ई-टॉयलेट स्वच्छ करण्यात आले.









