पाऊस आक्रमक, आजही मुसळधार शक्य
प्रतिनिधी /पणजी
राज्याला बुधवारी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. राजधानी पणजीत सायंकाळी 7 च्या दरम्यान सुरू झालेला पाऊस सुमारे अडीच तास कोसळला. या कालावधीत सुमारे अडीच इंच एवढी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने आज गुरुवार दि. 7 ऑक्टोबर रोजी देखील बहुतांश भागात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दिवसभर उकाडय़ाने हैराण झालेल्या, ‘ऑक्टोबर हिट’ची झळ बसलेल्या गोमंतकीय जनतेला सायंकाळी कोसळलेल्या पावसाने दिलासा दिला. राज्यातील बऱयाच भागात सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. राजधानी पणजीत कोसळलेल्या पावसाने पणजी शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. शहरातील 18 जून रस्त्यावरील पाण्याची पातळी वाढली. अनेक दुकानांमध्ये पाणी घुसले. सध्या राज्यात मोठय़ा प्रमाणात पर्यटक आलेले आहेत. मुसळधार पावसाने ते देखील अडचणीत आले आहेत. पणजीत सायंकाळी 7 वा. सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत पडत होता.
सांखळी व सत्तरीत पावसाने झोडपले
फोंडा, म्हापसा, पेडणे, पत्रादेवी दरम्यान मुसळधार पावसाने धुमाकूळच घातला. सांखळीत बुधवारी सकाळी जोरदार पाऊस पडल्यानंतर पुन्हा दुपारी व सायंकाळी तर पावसाने कहरच केला. वाळपई व संपूर्ण सत्तरीला पावसाने झोडपून काढले. पणजीतील पावसाने 16 मे रोजी तौक्ते चक्रीवादळाने कोसळलेल्या पावसाची आठवण करून दिली.
पणजीतील 18 जून रस्ता पाण्याखाली
दरम्यान या मुसळधार पावसामुळे 18 जून रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर चौकाचौकातून वाहतूक दुसऱया मार्गावरून वळविली तर मांडवी पुलावरून जाणाऱया वास्को, फोंडा दरम्यानच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सुमारे तासभर गाडय़ा अडकून पडल्या. या मुसळधार पावसाने अनेकांचे अक्षरशः हाल झाले.
गेल्या 24 तासात राज्यात सर्वाधिक 3 इंच पाऊस वाळपईत झाला. पेडणे 2.5 इंच, सांखळीत 1.5 इंच, केपे मध्ये 1.75 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा अर्धा इंच, पणजीत पाऊण इंच, दाबोळी अर्धा इंच, मडगाव 1 इंच, मुरगाव अर्धा इंच व केपेमध्ये पावणे दोन इंच व सांगेमध्ये 1 इंच पावसाची नोंद झाली. सायंकाळी हवामान खात्याने राज्यातील जनतेला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हा पाऊस आज सर्वत्र कोसळणार असे म्हटले आहे.









